भुसावळ प्रतिनिधी- सातबारा उताऱ्यावर शेतीची नोंद लावण्यासाठी मंडळाधिकाऱ्यांच्या नावाने १२ हजारांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या खाजगी पंटरासह कोतवालाला जळगाव एसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी एक वाजता अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. रवींद्र धांडे असे अटकेतील कोतवालाचे नाव आहे.
जळगाव एसीबीचे निरीक्षक संजोग बच्छाव व सहकाऱ्यांनी हा सापळा यशस्वी केला.कुम्हे पानाचे भागातील तक्रारदाराने या संदर्भात एसीबीकडे तक्रार दिली होती. शेतीची नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी त्यांनी मंडळाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी कोतवालांना भेटण्यास सांगितल्यानंतर रवींद्र धांडे यांनी १२ हजारांची लाच मागितली मात्र लाच द्यावयाची नसल्याने एसीबीकडे तक्रार नोंदवून सापळा रचण्यात आला. मंगळवारी दुपारी कोतवालाने खाजगी पंटराकडे लाच देण्याचा इशारा केल्यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. एसीबीच्या कारवाईनंतर तहसील कार्यालयात प्रचंड खळबळ उडाली.