गुणवत्ता वाढीसाठी महाविद्यालयांना स्वायत्तता

0
उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा खुलासा
नागपूर- राज्यातील उत्तम गुणवत्ता प्राप्त करणा-या महाविद्यालयांना वित्तीय स्वायत्त्ता देताना विदयार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे कुठलेही नुकसान होणार नाही. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठीच महाविद्यालयाना स्वायत्तता देण्यात येणार असल्याचा खुलासा  उच्च आणि  तंत्र शिक्षण मंत्री  विनोद तावडे यांनी गुरुवारी विधानसभेत  प्रश्नोत्तराच्या तासात केला.
राज्यातील उत्तम गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयांना वित्तीय स्वायत्तता देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाबाबत भाजपचे रणजीत सावरकर, विकास कुंभारे-पाटील, अमित पाटील आदींनी प्रश्न विचारला होता. याप्रश्नाला उत्तर देताना तावडे म्हणाले की, राज्यातील विद्यापीठावरील परीक्षांचे ओझे कमी करण्याबरोबर उत्तम गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी शैक्षणिक स्वायत्त्ता देण्याचा विचार आहे. सरकारचा आर्थिक भार कमी करण्याचा विचार नाही. तसेच यामुळे प्राध्यपक, शिक्षकांचे वेतन, शैक्षणिक शुल्क आदींमध्ये बदल होणार नाही. तसेच विद्यार्थ्यांची फी वाढणार नाही.  बहुजन समाजातील  विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेत असा सरकारचा हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.