राबडीदेवी आणि तेजस्वी यादव यांना जामीन

0

पटियाला-चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या लालूप्रसाद यादव कुटुंबीयांना आज काहीसा दिलासा मिळाला आहे. आयआरसीटीसी घोटाळ्याप्रकरणी राबडीदेवी आणि त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांना जामीन मिळाला आहे. पटियाला हाऊस येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर केला. आयआरसीटीसी घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणातील सर्व आरोपींना न्यायालयाने जामीन दिला आहे.

प्रत्येकाला वैयक्तिक जातमुलक्यावर आणि १ लाख रूपयांच्या हमीपत्रावर हा जामीन देण्यात आला. दरम्यान, लालूप्रसाद हे गुरूवारी रांची येथील सीबीआय न्यायालयासमोर शरण आले होते.

आयआरसीटीसीचे दोन हॉटेल खासगी कंपनीला चालवण्यासाठी देण्याच्या प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेप्रकरणी विशेष न्यायाधीश अरविंदकुमार यांनी सर्व आरोपींना न्यायालयात उपस्थितीत राहण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर २४ ऑगस्ट रोजी याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आरोपपत्र दाखल केले होते.

या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात लालूंच्या कुटुंबीयांसह माजी केंद्रीय मंत्री प्रेमचंद गुप्ता आणि त्यांची पत्नी सरला गुप्ता, आयआरसीटीसीचे तत्कालीन मुख्य व्यवस्थापक बी के अग्रवाल आणि आयआरसीटीसीचे तत्कालीन संचालक राकेश सक्सेना यांच्या नावाचा समावेश आहे. आरोपपत्रात इतर नावांमध्ये आयआरसीटीसीचे तत्कालीन समूह महाव्यवस्थापक व्ही के अस्थाना आणि आर के गोयल, सुजाता हॉटेलचे संचालक विजय कोचर आणि विनय कोचर आणि चाणक्य हॉटेलच्या मालकांच्या नावांचा समावेश आहे.