मुंबई : लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाला तिकीट न दिल्याने नाराज डॉ.सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करत खासदारकीची उमेदवारी मिळविली व विजयी झालेत. तेंव्हा पासून विधान सभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील पक्षाचे काम केले नाही. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते भाजपात जाणार अशी चर्चा असतांना त्यांनी आज आपला आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत अब्दुल सत्तारही उपस्थित होते. सत्तार यांनी मात्र अद्याप आपला राजीनामा दिलेला नाही. आमदारकीचा राजीनामा दिल्याला आता विखे पाटील यांचा भाजपा प्रवेशाचा मार्ग मोकळा झालाआहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत काँग्रेसचे ८ ते १० आमदार भाजपामध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहे. अब्दुल सत्तार यांच्यासोबतच जयकुमार गोरे, भारत भालके, गोपाळ अग्रवाल, सुनील केदार यांच्याही नावांची चर्चा सुरू आहे. याशिवाय नितेश राणे यांनी यापूर्वीच फारकत घेतली असून कालिदास कोळंबकरही भाजपाच्या संपर्कात आहेत. येत्या ९ जून रोजी विखे पाटील यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे.