नवी दिल्ली: भारतीय रिजर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची वर्णी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी होण्याची शक्यता आहे. ब्रिटीश मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार राजन यांचे नाव पुढे असल्याचे वृत्त दिले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टीन लेगार्ड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, ते या पदावर सप्टेंबर पर्यंत आपल्या पदावर राहणार आहे.
राजन यांच्याशिवाय बँक ऑफ इंग्लंडचे माजी गव्हर्नर मार्क कार्नी, डेव्हिड कॅमरून सरकारमध्ये चॅन्सलर राहिलेले जॉर्ज ओसबॉर्न आणि नेदरलँडचे माजी वित्त मंत्री जेरॉइन डिजस्सेलब्लोएम यांच्या नावांचीही चर्चा आहे. रघुराम राजन यांची यापूर्वी इंग्लंडचे गव्हर्नर बनवण्याचीही चर्चा होती. राजन यांनी मी या पदासाठी अर्ज केला नसल्याचा दावा करत हे वृत्त फेटाळले आहे.
राजन हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे २३ वे गव्हर्नर होते. त्यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९६३ साली भोपाळमध्ये झाला. २०१३ साली डी. सुब्बाराव निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आरबीआयचा पदभार स्वीकारला होता. सप्टेंबर २०१६ पर्यंत ते या पदावर होते. तत्पूर्वी यूपीए सरकारच्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रमुख आर्थिक सल्लागाराचीही त्यांनी भूमिका बजावली होती. राजन हे सध्या शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये शिकवितात.