नवी दिल्ली-काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद हाती घेतल्यापासून राहुल गांधी हे सातत्याने पक्षांतर्गत मोठे फेरबदल करताना दिसत आहेत. या बदलांतर्गतच त्यांनी मंगळवारी अनेक मोठ्या नेत्यांकडे महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्याकडे त्यांनी कोषाध्यक्षपद सोपवले आहे.
२० वर्षापेक्षा अधिक काळ ही जबाबदारी पक्षाचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांच्याकडे होती. व्होरा हे राज्यसभेचे सदस्यही आहेत. व्होरा यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रिपदही सांभाळले आहे. दरम्यान, गांधी घराण्याचे निष्ठावंत अशी पटेल यांची ओळख आहे. योगायोगाने आज पटेल यांचा वाढदिवस आहे. पक्षाकडून त्यांना वाढदिवसाची ही भेट मिळाल्याचे बोलले जात आहे. अहमद पटेल हे गुजरातमधून राज्यसभेवर निवडून गेले आहेत.
या निवडीबरोबरच आनंद शर्मा यांच्याकडे काँग्रेसच्या विदेश समितीची जबाबदारी देण्यात आली आहे. आनंद शर्मा हे राज्यसभेचे सदस्य असून पक्षाचे ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी मनमोहनसिंग सरकारमध्ये वाणिज्य आणि उद्योग मंत्रिपद सांभाळले आहे. शर्मा हे मोदी सरकारला राज्यसभेत विदेश आणि आर्थिक धोरणावरून कोंडीत पकडत असतात. त्याचबरोबर लुईजिनो फलेरो यांची ईशान्य राज्यांच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मीरा कुमार यांना काँग्रेसच्या कार्यकारिणीत स्थायी सदस्यत्व देण्यात आले आहे.