राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम; निर्णय घेण्यासाठी एका महिन्याची मुदत

0

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग आले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला आहे. मात्र पक्षाच्या कमिटीने त्यांचा राजीनामा नामंजूर केला. त्यांची समजूत काढण्यासाठी अनेक नेते प्रयत्नशील आहेत. मात्र राहुल गांधी हे अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर ठाम असून, त्यांनी अंतिम निर्णय घेण्यासाठी पक्षाला एक महिन्याची मुदत दिली असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर अडलेल्या राहुल गांधी यांची समजूत काढण्यासाठी आज सकाळी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी तसेच प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी त्यांची भेट घेतली. तसेच अध्यक्षपदासाठी पक्षाला नवा पर्याय मिळत नसल्याचेही राहुल गांधी यांच्या कानावर घालण्यात आल्याचेही बोलले जात आहे.

मंगळवारी सकाळपासून राहुल गांधीना भेटण्यासाठी प्रियंका गांधी, रणदीप सुरजेवाला, सचिन पायलट हे दाखल झाले होते. दरम्यान, मी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचे मन बनवले आहे. तुम्ही एक महिन्याची मुदत घ्या, पण माझा पर्याय निवडा, असे राहुल गांधी यांनी आज झालेल्या बैठकीत एका ज्येष्ठ नेत्याला सांगितल्याचे वृत्त आहे. तसेच प्रियंका गांधी यांना या सर्वापासून दूर ठेवा. त्या कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारणार नाहीत, असेही राहुल गांधी यांनी सांगितल्याचे वृत्त आहे.