नवी दिल्ली:‘चौकीदार चोर है’ या विधानावरुन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अडचणीत आले होते. ‘चौकीदार चोर है’वरून राहुल गांधीनी सुप्रीम कोर्टात खेद देखील व्यक्त केला आहे. दरम्यान आज पुन्हा सुप्रीम कोर्टात नवे प्रतिज्ञापत्र सादर केले. यामध्ये आपल्या विधानाबाबत राहुल गांधींनी पुन्हा एकदा खेद व्यक्त केला. मात्र, माफी मागितली नाही. भाजपाच्या खासदार मिनाक्षी लेखी यांच्याकडून दाखल अवमान याचिकेवर त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.
राहुल गांधी म्हणाले, राजकीय लढाई कोर्टात घेऊन जाणे हा आपला हेतू नाही. यावेळी सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. दीपक गुप्ता आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने राहुल गांधींच्या वकिलांना प्रतिप्रतिज्ञापत्र दाखल करण्यास परवानगी दिली. सुप्रीम कोर्टाने २३ एप्रिल रोजी राहुल गांधींना कोर्टाचा अपमानप्रकरणी नोटीस पाठवली होती. राफेल डीलप्रकरणी कथीत भ्रष्टाचाराशी संबंधीत सुप्रीम कोर्टानेही आता ‘चौकीदार चोर है’ असण्यावर शिक्कामोर्तब केल्याचे राहुल गांधींनी म्हटले होते. या विधानामुळे भाजपा खासदार मिनाक्षी लेखी यांनी राहुल गांधींविरोधात कोर्टात तक्रार अर्ज दिला होता. दरम्यान, जोशात येऊन आपण हे विधान केल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.