राहुल गांधींच्या विमानात तांत्रिक बिघाड; संगमनेरच्या सभेला विलंब

0

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची सांगता शनिवारी संध्याकाळी होणार आहे. तत्पूर्वी आज वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या सभांनी महाराष्ट्र ढवळून निघणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये प्रचारसभा घेणार आहे. मात्र पाटना येथील सभेला जात असताना राहुल गांधींच्या विमानात सकाळी तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे त्यांना पुन्हा दिल्लीला जावे लागले. याच कारणामुळे संगमनेरसह दिवसभरातील इतर सभांना उशीर होणार आहे.

राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार करण्यासाठी पाटणा येथे जात असताना त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यांच्या सभांना उशीर होणार आहे. राहुल गांधी यांनी स्वत: च सभांना उशीर होणार असल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे.

मुंबईमध्ये प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात काल गुरुवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा रोड शो होणार होता पण तोदेखील झाला नाही. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी देशात काही ठिकाणी सभांना संबोधित करीत आहेत. राहुल गांधी यांच्या प्रचाराचा झंझावात देशभर सुरू आहे. मात्र, काँग्रेसच्या प्रचाराचे मुख्य आधारस्तंभ असलेले हे दोन्ही नेते मुंबईत प्रचाराला आले नाहीत. प्रियंका गांधी यांनी प्रचारात स्वत:ला उत्तर प्रदेशपुरतेच यंदा मर्यादित ठेवले. मुंबई काँग्रेसमधील एकमेकांशी भांडणाऱ्या नेत्यांकडे पक्षनेतृत्वाने दुर्लक्ष केले असा त्याचा अर्थ लावला जात आहे.