सगळ्यांनी मिळून २०१९ मध्ये मोदींचा पराभव करूया-राहुल गांधी

0

नवी दिल्ली-काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज अॅट्रोसिटी विधेयकासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची दिल्लीत भेट घेतली त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली. जंतर मंतर या ठिकाणी असलेल्या आंदोलनात त्यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि आपली भूमिका मांडली. त्यांच्यासोबत डाव्या विचारांचे नेते सीताराम येचुरीही होते.

देशातील दलित आणि मागस लोकांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुळीच आस्था नाही अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दलित विरोधी आहेत, २०१९ च्या निवडणुकांमध्ये आपण सगळे मिळून त्यांचा पराभव करू असेही आवाहन यावेळी राहुल गांधी यांनी केले. काँग्रेसने कायम अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अॅक्टच्या रक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली आहे, ती यापुढेही तशीच राहिल असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

देशातल्या ज्या राज्यांमध्ये भाजपाचे सरकार आहे त्या राज्यात दलितांवर हल्ले होत आहेत, अत्याचार होत आहेत असाही आरोप राहुल गांधी यांनी केला. दोन दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी भारताच्या नागरिकांना आता काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीची गरज भासू लागली असल्याचे वक्तव्य केले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणूक प्रचारादरम्यान अच्छे दिनचा नारा दिला होता. हा नारा बोगस आणि खोटा ठरल्याचीही टीका राहुल गांधी यांनी केली. मोदी सरकारने सरकारी कामांतही पेचप्रसंग निर्माण केले असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.