जयपूर:राजस्थान येथील अलवर येथे एका महिलेवर तिच्या पतीसमोर झालेले बलात्कार प्रकरण लोकसभेच्या आखाड्यात चांगलेच रंगले असून यावरून मायावती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात शब्दांच्या फैरी झडल्या होत्या. आज कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पिडीतेची भेट घेतली असून, दोषींवर लवकरात लवकर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही आश्वासन त्यांनी पिडीतेला दिले. अशा प्रकरणात आपला पक्ष भाजपासारखे राजकारण करत नाही असेही ते यावेळी म्हणाले.
अलवर येथे २६ एप्रिल रोजी दुचाकीवरून जात असताना काही लोकांनी त्यांची गाडी अडवून पतीसमोरच बलात्कार केला होता. या प्रकरणाचा लोकसभेच्या प्रचारसभेमध्ये राजकीय पक्षांनी आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला होता. त्यात आता राहुल गांधी यांनी पिडीतेची भेट घेतली.
राहुल गांधी हे बुधवारी अलवर दौऱ्यावर येणार होते, पण खराब वातावरणामुळे त्यांचा दौरा रद्द करावा लागला होता. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पिडीतेची भेट घेतल्यानंतर पीडितेने सांगितले की, राहुल गांधी यांनी कुटुंबातील सदस्याप्रमाणे आमची भेट घेतली. आमचे म्हणणे ऐकून घेतले. आम्ही ज्या मागण्या केल्या त्या पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना दिले.