नवी दिल्ली: कॉंग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष करतात. देशातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येवरून देखील त्यांनी आता मोदींना निशाणा केला आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने एक कोटीचा टप्पा ओलांडला आहे. देशातील आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या ही १ कोटी चार हजार ५९९ एवढी झाली आहे. रुग्ण संख्येच्या बाबतीत भारत हा अमेरिकेनंतरचा दुसरा देश ठरला आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटरवरून “अनियोजित लॉकडाऊनमुळे देशातील कोट्यवधी लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले” असे म्हणत राहुल गांधींनी निशाणा साधला आहे. “देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीवर तर जवळपास दीड लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधानांनी २१ दिवसांत कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्याचा दावा केला होता. मात्र, अनियोजित लॉकडाऊनमधून ते साध्य झालं नाही. पण, देशातील कोट्यवधी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं” असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.