मोदींच्या पत्रकार परिषदेवर राहुल गांधींची टीका; प्रश्नांची उत्तरे द्यायची हिंमत नसल्याचे आरोप

0

नवी दिल्ली: पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी आज पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली. मात्र या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देणे टाळले आहे. यावरून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषद घेत असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचीही पत्रकार परिषद सुरु होती. यावेळी त्यांनी थेट प्रश्न विचारत माझ्यासोबत राफेलवर चर्चा का करत नाही ? अशी विचारणा केली आहे. राहुल गांधी यांनी मोदींच्या पत्रकार परिषदेत मागचे दरवाजेही बंद करण्यात आले आहेत असा आरोप केला. मी आपल्या बाजूने दोन तीन पत्रकार पाठवा असे सांगितले होते, जेणेकरुन आपले प्रश्न विचारले जातील. पण दरवाजे बंद करण्यात आले आहेत असे राहुल गांधींनी सांगितले.

नरेंद्र मोदींची विचारसरणी हिंसेची असून गांधींच्या विचारांची नाही असा टोला यावेळी राहुल गांधींनी लगावला. २३ मे रोजी जनता जो निर्णय घेईल त्याच्या आधारे काम केले जाईल, त्याआधी त्याच्यावर बोलू शकत नाही. जनतेच्या मताचा आम्ही आदर करतो असेही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.

निवडणूक आयोगाची भूमिका नेहमीच पक्षपाती राहिली आहे असा आरोप यावेळी राहुल गांधी यांनी केला. नरेंद्र मोदी जे हवं तो बोलून जातात, इतर कोणी बोललं तर त्याला टोकले जात. मोदींना प्रचार करता यावा अशा पद्धतीने निवडणुकीचं वेळापत्रक तयार करण्यात आलं असाही आरोप यावेळी त्यांनी केला. आम्ही निवडणूक आयोगावर विश्वास ठेऊ शकतो त्यापेक्षा जास्त काही करु शकत नाही असेही यावेळी राहुल गांधींनी सांगितले.