रायपूर – छत्तीसगडमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मोठा रोड शो करणार आहेत. ‘राज्यातील चांगल्या पद्धतीने तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर रॅलीच्या आयोजनासाठी त्यांचे स्वागत आहे,’ असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी राहुल यांची खिल्ली उडवली आहे. काँग्रेस अध्यक्षांना टोमणा मारताना, रमण सिंह यांनी म्हटले आहे, की छत्तीसगडमधील रस्ते अमेठीतील रस्त्यांसारखे नाही. मात्र ते दुचाकींसाठी चांगले आहेत.
रमण सिंह म्हणाले, ‘राहुल गांधी राज्यात त्यांना आवडेल तेथे दुचाकी रॅली काढू शकतात, राज्यातील रस्ते अत्यंत चांगले आहेत. राहुल जेथे दुचाकी रॅली काढूच शकत नाहीत, अशा अमेठीतील रस्त्यांप्रमाणे ते नाहीत.’ येथे १७मेला राहुल यांनी दुचाकी रॅलीचे आयोजन केले आहे. यावेळी रमण सिंह यांनी कर्नाटक निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित आहे, असा विश्वास व्यक्त केला आहे. कर्नाटकात १२ मेला विधानसभेसाठी मतदान होत आहे. तर १५ मेला निवडणूक निकाल जाहीर होणार आहेत.