जळगाव रेल्वेस्टेशन परिसर व्यसनींचा अड्डा ; रात्रभर रेल्वेस्थानकावर दुकाने राहतात सुरुच ; गस्तीवरील पोलिसांचा अर्थपूर्ण व्यवहारातून कानाडोळा
जळगाव – संपूर्ण शहरात एकीकडे दिवस संपतो, त्याचवेळी शहरातील एक ठिकाण आहे की जेथे दिवसाला सुरुवात होते. ते म्हणजे रेल्वे स्टेशन. अंधार पडला की याठिकाणी खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्या, लोटगाट्या लागतात. व कुणाचाच धाक नसल्याने रात्रभर त्या सुरुही राहतात. बिनधास्तपणे रात्रीच्या वेळी उघड्यावर याठिकाणी गुटखा विक्री होतो. रेल्वेस्थानक म्हणजे रात्रीच्या वेळचा भयावह अड्डा झाला असून शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडून मिळत असलेला ‘अभय’च रेल्वेस्थानकावरील हाणामारी भांडण, गुन्ह्यांच्या घटनांना कारणीभूत ठरत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे यातून नुकताच एकाने एअरगन काढण्याचाही प्रकार घ
ला होता, याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे असून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
किरकोळ वादाचे पर्यवसन हाणामारीत
जळगाव रेल्वेस्थानकावर काही महिन्यांपूर्वी किरकोळ वादातून चाकूने भोसकून एका तरूणाची हत्त्या करण्यात आली होती. संपूर्ण जळगाव शहरातील दुकाने, रात्री 10 वाजेच्या सुमारास फार फार तर 11 वाजता बंद होत असताना केवळ रेल्वेस्टेशन परिसरातच रात्रभर विविध विक्रेत्यांची दुकाने सुरू असतात. रात्रीही किती वाजता या, रेल्वेस्टेशन गुटखा, सिगारेट, चहा, अंडाभुर्जी सहजच मिळत असल्याने याठिकाणी रात्रभर बाहेरगावच्या तरुणांसह व्यसन करणार्यांची चंगळ असते. त्यामुळे किरकोळ वाद तर नित्याचेच आहे. या किरकोळ वादाचे पर्यवसन हाणामारीत होवून चाकू, धारधार शस्त्रापर्यंत थेट वाद पोचहत असल्याचे चित्र आहे. मात्र या हाणामारी, वादाची शहर पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद नसते, तेरी भी चूप अन् मेरी चूप याप्रमाणे प्रकरण दडपले जात असल्याचेही समजते.
रात्रभर दुकाने सुरु ठेवणार्यांना पोलिसांचेच अभय
रेल्वेस्थानक परिसरात तीन दिवसापूर्वी मध्यरात्रीनंतर 1.30 वाजेच्या सुमारास दोन वेगवेगळे वाद झाले. यावेळी एका गटातील तरूणाने एअरगन काढून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता. थेट उपविभागीय अधिकार्यांपर्यंत सुज्ञ नागरिकामुळे हा वाद पोहचल्याने त्यांनीच घटनास्थळ गाठले होते. कायदा सर्वांना सारखा याप्रमाणे शहरात सर्वत्र 10 वाजेची बंदची वेळ असताना, याठिकाणी रात्रभर दुकाने सुरुच राहतात कशी? तर गुटखा,सिगारेट सह लोटगाडी खाद्यपदार्थ विक्रेत्याने शहर पोलीस ठाण्याचेचे अभय आहे. त्यामुळे ‘संसार माझ्या बापाचा त्यावर कायदा कुणाचा’ या उक्तीप्रमाणे ना कुणाचा डर ना भिती, याप्रमाणे बिनधास्तपणे दुकाने सुरुच राहतात.
पोलिसांचा ना धाक ना दरारा?
रात्री जर रेल्वेस्थानक परिसरातील दुकाने बंद राहिली तर याठिकाणी गर्दी होणार नाही, अन् कुठलाच वाद, अथवा हाणामारीच्या घटना उद्भवणार नाही. एकीकडे डॉ. निलाभ रोहन यांची अवैधधंदे तसेच रात्री मद्यप्राशन करुन वाहन चालविणार्यांवर कारवाईची मोहिम राबविली. रात्रभर चंगळ राहणार्या रेल्वेस्टेशनकडे त्यांचे दुर्लक्ष कसे? काही महिन्यांपूर्वी खुनाची घटना घडली होती, त्यानंतरही कुठेलही सोयरसुतक नसल्याने वरिष्ठ अधिकारी पुन्हा मोठी दुर्घटनेची वाट पाहत आहे काय? असाही संतप्त सवाल उपस्थित होत आहे.