मुंबई:-धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे अफवेमुळे 5 निष्पाप लोकांचा बळी जाणे ही घटना गंभीर आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. माणसातील राक्षस काय असतो ते या घटनेने दाखवून दिले आहे, निघृण हा शब्दही अपुरा पडेल. जलदगती न्यायालयात हा खटला चालवला जाईल तसेच या भटक्या समाजाच्या पुनर्वसनासाठी योजना तयार केली जाईल आणि या घटनेतील कुटुंबियांचे पूर्ण पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले.
पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी राईनपाडा येथील घटनेचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. भालके यांनी सांगितले की,घटनेची माहिती जवळच्या पोलीसांना दिली तरीही त्याची दखल लवकर घेतली नाही. अशाच प्रकारच्या घटना इतर ठिकाणीही घडले आहेत. पारधी समाजाप्रमाणे डवरी गोसावी समाजाच्या पुनर्वसनाचा कार्यक्रम जाहीर करावा आणि या प्रकरणात कडक कारवाई व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.
हे देखील वाचा
यावर मुख्यमंत्री म्हणाले की, ही घटना घडल्यानंतर पंचायत समिती सदस्याने माहिती दिल्यानंतर पोलीस तात्काळ निघाले पण गाव 40 किलोमीटर लांब होते त्यामुळे ते एका तासाभराने पोहोचले. पोलीस पोहचेपर्यंत मारहाण झाली होती. या घटनेचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहे. त्याद्वारे सगळ्यांचा शोध घेतला जाईल. कुणालाही सोडणार नाही. कठोरतली कठोर शिक्षा केली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले.