राज्यपालांनी काढला अध्यादेश; ४ जुलैपासून सुरुवात
मुंबई:- विधिमंडळाचे ४ जुलैपासून होणारे पावसाळी अधिवेशन नागपूर मध्ये घेण्याचे अखेर निश्चित झाले आहे. यासंदर्भात राज्यपाल विद्यासागर राव यांनी अध्यादेश काढले असून ४ जुलैपासून अधिवेशन नागपूर येथे सुरु आहे. आतापर्यंत विधिमंडळाचे पा वसाळी अधिवेशन मुंबईतच घेतले जात होते. मात्र पावसाळी अधिवेशन आता नागपुरात घेण्याबाबत सरकारचे प्रयत्न सुरू होते. अखेर गुरवारी यावर शिक्कामोर्तब झाले.
हे देखील वाचा
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत होणार की नागपुरात याबाबत कमालीची उत्सुकता असली तरी विधिमंडळातील तसेच मंत्री आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मात्र नागपूरच्या तयारीची लगबग सुरू केली होती. विधिमंडळाचे नागपूरमध्ये पार पडणारे हिवाळी अधिवेशन सोडले, तर इतर सर्व अधिवेशने एखादा अपवाद वगळता मुंबईतच पार पडतात. मात्र यावेळचे पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याविषयी सत्ताधारी पक्षाकडून प्रयत्न सुरू होते. अलिकडेच विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. त्यातही पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याबाबत चर्चा झाली, मात्र ठोस निर्णय होऊ शकला नव्हता. नागपूर येथे पावसाळी अधिवेशन घेण्यास शिवसेनेने विरोध दर्शवला होता. मात्र याविषयी शिवसेनेला राजी करण्यात आले असून पावसाळी अधिवेशन नागपुरातच पार पडणार आहे.
आता विधिमंडळाचे अधिकारी, कर्मचारी यांची प्रवासाचे आरक्षण, विमान तिकिटांचे आरक्षण यांची लगबग सुरू झाली आहे. शिवाय विधिमंडळ अधिकाऱ्यांना नागपूर येथे पाठवून प्राथमिक पाहणी करण्यासही सांगण्यात आल्याची माहिती आहे. येत्या चार जुलैपासून हे अधिवेशन सुरू झाल्यास ठरल्याप्रमाणे तीन आठवडे इतके कामकाज चालणार आहे.