महाआघाडीत मनसेला घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रस्ताव काँग्रेसने नाकारला

0

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसने महाआघाडीमध्ये मनसेला घेण्याचा प्रस्ताव काँग्रेस पक्षासमोर ठेवला आहे. पण काँग्रेसने याला विरोध दर्शवला असल्याची माहिती काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी दिली आहे. या प्रस्तावाला काँग्रेसचा केंद्रीय आणि राज्य स्तरावर विरोध आहे, अशी माहिती देत मनसे महाआघाडीचा भाग नसेल, असे निरुपम यांनी स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वी मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मनसेला महाआघाडीमध्ये सहभागी करुन घेण्याचा प्रस्ताव काँग्रेससमोर ठेवला. या प्रस्तावावर काँग्रेसकडून अद्याप सहमती दर्शवण्यात आली नाही. मात्र, राष्ट्रवादीने प्रस्ताव ठेवल्याने त्यांची सहमती असल्याचे प्रथमदर्शन दिसून येते आहे. नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखण्यासाठी महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरणं दिसण्याची शक्यता आहे.

मनसे आणि आमची विचारधारा जुळत नाही. मनसे कायद्याचे पालन करत नाही, हिंसेचे राजकारण करतात. २०१४ च्या निवडणूकीत राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता, आताही त्यांनी मोदींना पाठिंबा द्यायला हवा, भाजपाचे आणि त्यांचे जवळचे संबंध आहेत, असेही निरुपम म्हणाले. मनसेकडे मते आहेत, का, असतील तर ते त्यांना लाभो, असे म्हणत मनसे महाआघाडीचा भाग होणार नाही, असे निरुपमांनी स्पष्ट केले. या प्रस्तावाचा महाआघाडीवर परिणाम होऊ नये, अशी आशा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्टपणे कळवले असल्याचे निरुपम म्हणाले.