मुंबई:१७ व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज देशभरात मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रात आज शेवटच्या टप्प्यातील मतदान होत आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील दादर येथील बालमोहन विद्यामंदिर शाळेत आपल्या कुटुंबीयांसोबत मतदान केले. पण यावेळी मतदान केंद्रावर असणारी गर्दी आणि इतर गोष्टींमुळे राज ठाकरेंना जवळपास दोन तास रांगेत उभे राहावे लागले.
राज ठाकरे सकाळी ११ वाजता मतदान करण्यासाठी केंद्रावर येणार असल्या कारणाने प्रसारमाध्यमांनी गर्दी केली होती. राज ठाकरे कुटुंबीयांसह ११.३० वाजण्याच्या सुमारास पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत आई कुंदा ठाकरे, पत्नी शर्मिला, मुलगा अमित व मुलगी उर्वशी उपस्थित होते. राज ठाकरे येताच प्रसारमाध्यमांनी त्यांची छबी टिपण्यासाठी त्यांना गराडा घातला. पण यामुळे मतदान केंद्रावर जाणारा मार्ग अडल्याने सोबतच वरिष्ठ नागरिकांना धक्का लागत असल्याने राज ठाकरे प्रसारमाध्यमांवर चांगलेच चिडले. एका कॅमेरामनला त्यांनी हाताने बाजूलाही केलं आणि शांत राहा असेही सांगितले.
मतदान केंद्रावर आधीच रांग लागली होती. राज ठाकरेही कुटुंबासहित रांगेत उभे होते. ज्येष्ठ नागरिक असल्या कारणाने त्यांच्या आईंना लगेचच मतदानाचा हक्क बजावत आला. मात्र यावेळी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागल्याने राज ठाकरे जवळपास दोन तासाहून जास्त वेळ रांगेत उभे राहिले. यावेळी रांगेत उभे लोक तसंच मतदान करुन येणारे मतदार त्यांना स्मितहास्य देत संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते.