मद्रास: दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली आरोपी नलिनीची ३० दिवसांच्या पॅरोल रजेवर सुटका झाली आहे. गेल्या २८ वर्षांपासून नलिनी कारागृहात शिक्षा भोगत असून मद्रास उच्च न्यायालयाकडून तिला पॅरोल मंजूर करण्यात आला. मुलीच्या लग्नासाठी नलिनीने पॅरोलची मागणी केली होती. नलिनीने अर्जात सहा महिन्यांसाठी पॅरोल देण्यात यावा अशी मागणी केली होती. पण न्यायालायने फक्त ३० दिवसांची मंजुरी दिली आहे. आज गुरुवारी २५ रोजी सकाळी नलिनी कारागृबाहेर आली तेव्हा तिचे नातेवाईक बाहेर उपस्थित होते. राजीव गांधी हत्या प्रकरणी १९९१ मध्ये नलिनीला अटक करण्यात आली. तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण नंतर फाशीची शिक्षा माफ करुन जन्मठेपेत रुपांतर करण्यात आले.
५ जुलै रोजी उच्च न्यायालयाने निर्णय देत नलिनीला पॅरोल मंजूर केला. मुलीच्या लग्नाची तयारी करायची असल्या कारणाने पॅरोल देण्यात यावा अशी विनंती नलिनीकडून करण्यात आली होती. न्यायालायने पॅरोल मंजूर करताना नलिनीला या ३० दिवसांमध्ये कोणत्याही प्रसारमाध्यमांशी संवाद न साधण्याची ताकीद दिली आहे. पॅरोलच्या कार्यकाळासाठी न्यायालयाकडून विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.
याआधी तिला २०१६ रोजी वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी १२ तासांचा पॅरोल मंजूर कऱण्यात आला होता. इतक्या मोठ्या काळासाठी पॅरोल मंजूर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तिच्या मुलीचा विवाह आहे. नलिनीच्या मुलीचा जन्म वेल्लोर कारागृहातच झाला होता. नंतर ती युकेमध्ये स्थायिक झाली.