राजकुमार हिरानी यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप !

0

मुंबई: प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानीवर लैंगिक शोषणाचा आरोप झाला आहे. संजू चित्रपटाच्या निर्मितीनंतर हा धक्कादायक प्रकार झाल्याचे पीडित महिलेने सांगितले आहे. हिरानीवर आरोप करणाऱ्या महिलेने ‘संजू’ चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केले आहे. राजकुमार हिरानीने मार्च ते सप्टेंबर २०१८ या सहा महिन्यात अनेकदा आपले लैंगिक शोषण केल्याचे आरोप महिलेने केले आहे.

राजकुमार हिरानीने केलेल्या कृत्याची माहिती पीडित महिलेने संजूचे सहनिर्माते विधू विनोद चोप्रा यांना मेलद्वारे दिली. याशिवाय विधू यांची पत्नी अनुपमा चोप्रा, कथा लेखक अभिजात जोशी, विधू यांची बहीण आणि संचालिका शेली चोप्रा यांनादेखील तिने मेल केला आहे.

दरम्यान याप्रकरणी राजकुमार हिरानीच्या वकिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिरानी यांच्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचं वकील आनंद देसाई यांनी सांगितले आहे.

बॉलीवूडमध्ये गेल्या वर्षभरापासून #Metoo या मोहिमेंतर्गत अनेक कलाकार, दिग्दर्शकांवर लैंगिक छळाचे आरोप झाले. अजूनही हे वादळ शांत झालेले नाही.