राजनाथ सिंहाची ‘तेजस’मधून भरारी; ठरले पहिले मंत्री !

0

बंगळुरू: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज संपूर्ण भारतीय बनावटीच्या तेजस लढाऊ विमानामधून उड्डाण केले. तेजय विमानातून उड्डाण करणारे राजनाथ सिंह पहिले संरक्षणमंत्री ठरले आहेत.

राजनाथ सिंह यांनी तेजसमधून अर्धा तास उड्डाण केले. ”तेजसमधून उड्डाण करणे हा सुखद अनुभव आहे. हे विमान उत्तम आणि आरामदायक आहे. मी या उड्डाणाचा आनंद घेतला. अशा विमानाच्या निर्मितीसाठी मी एचएएल, डीआरडीओ आणि इतर संस्थांचे अभिनंदन करतो. आज आपण या विमानांची जगातील इतर देशांमध्ये निर्यात करण्याच्या स्तरापर्यंत पोहोचलो आहोत.” असे अनुभव राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले.

भारतीय बनावटीच्या तेजस हे हलक्या जातीचे विमान आहे. या विमानाची संकल्पना 1983 मध्ये समोर आली होती. त्यानंतर दहा वर्षांनी 1993 मध्ये या प्रकल्पाला मान्यता मिळाली होती. तेजस विमानाची निर्मिती हिंदुस्तान एअरोनॉटिकल लिमिटेड (HAL) या कंपनीने केली आहे. स्वदेशी बनावटीचे तेजस हे हलक्या विमानांच्या श्रेणीमधील लढाऊ विमान आहे. या विमानाचे आवरण कार्बन फायबरपासून बनवण्यात आलेले आहे. त्यामुळे धातूपासून बनवण्यात येणाऱ्या विमानांच्या तुलनेत हे विमान वजनाने खूप हलके आहे. मात्र वजनाने हलके असले तरी इतरक विमानांच्या तुलनेत हे विमान अधिक मजबूत आहे.