मायावतींना धक्का; राजस्थानमधील सर्व आमदारांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

0

जयपूर: बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांना राजस्थानमध्ये जोरदार झटका बसला आहे. राजस्थानमधील बसपाच्या सर्व ६ आमदारांनी सत्ताधारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या आमदारांनी विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांना काल सोमवारी रात्री उशीरा याबाबत पत्र दिले आहे. बसपाच्या या सर्व आमदारांचा काँग्रेसला बाहेरुन पाठींबा होता.

विधानसभा अध्यक्षांना पत्र देण्यापूर्वी बसपाच्या या सहाही आमदारांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची भेट घेतली होती. आज मंगळवारी यावरील प्रक्रिया पार पाडली जाईल. राजस्थानमधील सध्याची परिस्थिती २००९ मधील परिस्थितीप्रमाणे झाली आहे. २००८च्या विधानसभा निवडणुकीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यानंतर त्यावेळी देखील बसपाचे ६ आमदार काँग्रेसच्या गेहलोत सरकारमध्ये सामिल झाले होते.

बसपाच्या आमदारांनी यापूर्वी काँग्रेस सरकारमध्ये सामिल न होता बाहेरुन पाठींबा दिला होता. त्यामुळे सरकार अस्थिर स्थितीत होते. मात्र, आता हे आमदार काँग्रेसमध्ये सामिल झाल्याने सरकार स्थिर झाले आहे. त्यामुळे राजस्थानातील २०० जागांच्या विधानसभेत काँग्रेसची संख्या १०६ झाली आहे. सध्या या विधानसभेच्या दोन जागा रिक्त आहेत. त्याचबरोबर काँग्रेसला सध्या राष्ट्रीय लोक दलाच्या एका आमदाराचा आणि १३ अपक्ष आमदारांपैकी १२ आमदारांचाही पाठींबा आहे.