नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कॉंग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची तयारी केली आहे. त्यांनी पक्षाला तसे सुचविले देखील आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक गेहलोत यांच्या गळ्यात काँग्रेस अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता आहे.
काँग्रेस पक्षाकडून गेहलोत यांचे नाव निश्चित करण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. परंतु, अद्याप हे स्पष्ट होऊ शकले नाही की, गेहलोत एकटेच काँग्रेस अध्यक्ष होणार की, त्यांच्या साथीला आणखी काही नेत्यांना कार्यकारी अध्यक्ष बनविले जाणार. तर गेहलोत यांच्या नावामुळे काँग्रेसचे पुढील अध्यक्षपद गांधी घरण्याकडे नसणार हे देखील स्पष्ट झाले आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, काँग्रेसकडून लवकरच नव्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा होऊ शकते. काँग्रेसने वरिष्ठ नेते अशोक गेहलोत यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित केले आहे. राहुल गांधी यांचा बुधवारी वाढदिवस झाला. त्यावेळी राहुल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना गेहलोत यांनी राहुल यांना अध्यक्षपदी कायम राहण्याची विनंती केली होती. मात्र राहुल खुद्द अध्यक्षपदी राहू इच्छित नाहीत. तसेच अध्यक्षपदासाठी प्रियंका गांधी यांच्या नावाचा विचार नसल्याचे राहुल यांनी आधीच स्पष्ट केले होते.