जयपूर : राजस्थान रॉयल्सने आज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला. आज कर्णधारपद अजिंक्य राहणेकडून काढून ते स्टीव्हन स्मिथकडे देण्यात आल्यानंतर पहिलाच विजय मिळाला. कर्णधार म्हणून यंदाच्या हंगामात प्रथमच मैदानावर उतरलेल्या स्टीव्हन स्मिथने अर्धशतकी खेळी करताना राजस्थानला विजय मिळवून दिला. मुंबईने राजस्थानसमोर १६२ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान राजस्थानने 5 विकेट राखून पूर्ण केले. स्मिथला परागने 29 चेंडूंत 43 धावा काढत उत्तम साथ दिली. स्मिथने 48 चेंडूंत नाबाद 59 धावा केल्या.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा 5 धावांवर बाद झाल्यानंतर क्विंटन डी कॉक आणि सूर्यकुमार यादव यांनी दमदार खेळ केला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी करताना अंबाती रायुडू व महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला. या दोघांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने राजस्थान रॉयल्ससमोर 162 धावांचे लक्ष्य ठेवले. डी कॉकने 47 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकार खेचून 65 धावा केल्या. यादवने 34 तर हार्दिक पांड्याने 23 धावा केल्या.