शत्रू राष्ट्राकडून साखरची आयात का?- राजू शेट्टी

0
मुंबई :- देशात साखरेचे दर घसरलेले असतांनाच दुसरीकडे पाकिस्तानची साखर आयात करून बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात आहे. साखरेची निर्यात करण्यापेक्षा पाकिस्तानची साखर आयात केली जाते आहे. पाकिस्तानची साखर मुंबईत आलीच कशी? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी सरकारला केला.  सरकारला शेतकऱ्यांची किती काळजी आहे, यावरूनच स्पष्ट होते, असा टोलाही त्यांनी लगावला.

मालाला भाव मिळू नये असे धोरण राज्यकर्त्यांचे धोरण

‘बळिराजाला दयेची नाही तर न्यायाची गरज आहे’ या विषयावर वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेत शेट्टी यांचे व्याख्यान झाले. देशामध्ये पाच रुपये किलो दराने टोमॅटो विकला जात होता, तेव्हा पाकिस्तानात टोमॅटोचा दर दोनशे रुपये किलो होता. टोमॅटोचा दर कितीही झाला तरी भारताकडून टोमॅटोची आयात करायची नाही, अशी भूमिका पाकिस्तानने घेतली. आम्ही मात्र खुशाल शत्रू राष्ट्राकडून साखर आयात करीत आहे, असे सांगून शेट्टी म्हणाले, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळू नये असे धोरण राज्यकर्त्यांनी आखून ठेवले आहे. शेती आणि पूरक व्यवसायातील अपुरी गुंतवणूक तसेच पायाभूत सुविधांअभावी दरवर्षी राज्यातील साडेबारा हजार शेतकरी आत्महत्या करीत आहेत. कृषी मूल्य आयोग राज्यकर्त्यांच्या हातातले बाहुले बनले आहे. शेती व्यवसाय सोडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळेच यंदा बँकांनीही हजारो शेतकऱ्यांना कर्ज नाकारले आहे.