आढावा बैठकीत अधिकार्यांच्या कार्यपध्दतीवर नगरसेवकांनी व्यक्त केला संताप,साफसफाईच्या प्रश्नावरुन अधिकार्यांना धरले धारेवर
जळगाव: शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि शहरातील अस्च्छेतेमुळे नाराजी व्यक्त करत आमदार राजूमामा भोळे यांनी मनपा अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले.कामकाजात सुधारणा करा. आयुक्त कारवाई करतील तेव्हा करतीलच.मात्र कामचुकारपणा केल्यास अधिकार्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा त्यांनी दिला.तसेच नियोजन करण्याची सूचना देखील दिल्या.
महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार राजूमामा भोळे यांनी मनपा अधिकार्यांची आढावा बैठक घेतली.यावेळी व्यासपीठावर उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे,स्थायी सभापती अॅड.शुचिता हाडा,महिला बालकल्याण सभापती शोभा बारी,आयुक्त डॉ.उदय टेकाळे,उपायुक्त उत्कर्ष गुठ्ठे उपस्थित होते. यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी मनपाच्या सर्व विभाग प्रमुखांकडून आढावा घेतला.
सफाईच्या विषयावरुन नगरसेवक आक्रमक
शहरातील साफसफाईसाठी गेल्या तीन महिन्यापूर्वी एकमुस्त ठेका दिला आहे.मात्र साफसफाई होत नसल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या असून सत्ताधार्यांविरुध्द तसेच अधिकार्यांविरुध्द नाराजीचा सूर उमटत आहे.त्यामुळे आक्रमक झालेल्या नगरसेवकांनी संताप व्यक्त केला.सफाईच्या ठेक्यात भाजप नगरसेवकांची भागीदारी असल्याचा आरोप होवू लागला असून अधिकार्यांमुळे पक्षाची बदनामी होत असल्याचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी अधिकार्यांना खडेबोल सुनावले. वार्डात समाधानकारकपणे सफाई न केल्यास वार्डातील कचरा सभागृहात आणून टाकण्याचा इशाला कुलभूषण पाटील यांनी दिला. ठेकेदाराची मनमानी सुरु आहे असा आरोप करुन चेतन सनकत यांनी ठेकेदाराला नोटीस देण्याची सूचना मांडली. साफसफाईचा एकमुस्त ठेका देताना आनंद झाला होता.परंतु आता पूर्वीचाच ठेका चांगला होता असे म्हणत राजेंद्र घुगे-पाटील यांनी ठेकेदाराच्या कामावर नाराजी व्यक्त केली. एकमुस्त ठेका असल्यामुळे ठेकेदाराची मोनोपाली आहे.त्यामुळे ठेका रद्द करण्याची मागणी कैलास सोनवणे यांनी केली.तसेच वेगवेगळे चार ठेके द्या अशी सूचना देखील सोनवणे यांनी केली. मनपाचे अधिकारी दुर्लक्ष करतात असे म्हणत सचिन पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.तर खुले भूखंड देखील स्वच्छ करण्याची मागणी नगरसेविका उज्जवला बेंडाळे यांनी केली.
आरोग्य अधिकार्यांबाबत नाराजी
शहरातील साफसफाईची जबाबदारी आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांच्यावर आहे.मात्र ते जबाबदारी स्वीकारण्यास असमर्थ असल्याचा आरोप करत नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. महिनाभरात कामात सुधारणा न केल्यास स्वत:हून बदली करुन घ्यावी अशा शब्दात आमदार राजूमामा भोळे यांनी आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांची खरडपट्टी काढली.तसेच आयुक्त टेकाळे यांनीही आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली.
आमदार राजूमामा भोळे अधिकार्यांवर संतापले
साफसफाईच्या मुद्दयावर नगरसेवकांनी तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांनी ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केल्याचे सांगितले.यावर आमदार राजूमामा भोळे यांनी संताप व्यक्त करत दंड आकारुन प्रश्न सुटणार नाही.आपल्याला स्वच्छता पाहिजे.अधिकार्यांप्रमाणे नगरसेवकांचीही दबाबदारी असल्याचे सांगितले.कामचुकारपणा करु नका.महिनाभरात कामात सुधारणा करा. जे कामात हलगर्जी करत असतील त्यांच्यावर कारवाई करा.आयुक्त कारवाई करतील तेव्हा करतीलच मात्र आम्ही अधिकार्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा देखील आ.भोळे यांनी दिला.
आजपासून पदाधिकारी करणार प्रभागात दौरा
साफसफाई व्यवस्थीत होत आहे किंवा नाही याची पाहणी करण्यासाठी तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत दररोज दोन प्रभागात दौरे करुन पाहणी करावी.पाहणी दौर्यात मनपा पदाधिकारी,नगरसेवक,अधिकारी आणि मी स्वत: राहणार असल्याचे आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले.त्यानुसार उद्या दि.12 पासून दररोज दोन प्रभागात दौरे करण्यात येणार आहे.
पर्याय सूचवा,उद्याच ठेका रद्द -आयुक्त टेकाळे
आढावा बैठकीत नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करत एकमुस्त ठेका रद्द करण्याची मागणी केली.यावर आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी पर्याय सूचवा,उद्याच ठेका रद्द करतो असे सांगितले.तसेच वार्डात साफसफाई न झाल्यास आरोग्य अधिकारी,आरोग्य निरीक्षक आणि मुकादम यांच्यावर जबाबदारी निश्चित करुन दंडात्मक कारवाई केली जाईल अशी तंबी आयुक्त उदय टेकाळे यांनी दिली.तसेच कामाचे नियोजन करण्याचेही त्यांनी सांगितले.