पुणे – डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी कोपरगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमात रामदास आठवले कोण? अशा शब्दांत त्यांना झिडकारले होते. परंतु रामदास आठवले यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘प्रकाश आंबेडकर यांनी कोण रामदास आठवले म्हटले तरी कोण प्रकाश आंबेडकर’, असे मी विचारणार नाही. ज्यांना मी ऐक्यासाठी बोलावूनही ते आले नाहीत ते प्रकाश आंबेडकर, अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना प्रत्युत्तर दिले आहे. मला महाराष्ट्रसह सारा देश ओळखतो, त्यांनी मला ओळखण्याची गरज नाही. असे त्यांनी आंबेडकर यांना ठणकावले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गटाचे) राज्यव्यापी अधिवेशन उद्या पुण्यात होत आहे. त्याआधी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
…तर शिवसेनेचे नेते फुटू शकतात
आगामी निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाने युती केली दोन्ही पक्षांचा फायदा होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच पालघर, भंडारा – गोंदिया येथे भाजप आणि शिवसेनेची भाषा ही निवडणुकीची आहे. मात्र शिवसेनेने युती केली नाही तर त्यांचे काही नेते फुटू शकतात, असे भाकितही त्यांनी वर्तवले. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करायचे तर युती करायलाच हवी असेही ते म्हणाले. भाजपाच्या नव्या धोरणाला अनुसरून त्यांनी नियत साफ, विकास साफ आणि 2019साली कॉँग्रेसही देशातून साफ होईल, अशी भविष्यवाणी त्यांनी केली.