रमेश कराड यांची निवडणुकीतून माघारी

0

बीड: लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद मतदारसंघात राजकीय रंग चढले आहे. भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झालेले उमेदवार रमेश कराड यांनी आश्चर्यकारकरित्या उमेदवारी मागे घेतला आहे. गोपीनाथ मुंडेंचे खंदे समर्थक असलेल्या रमेश कराड यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने परभणीची बाबाजानी दुर्राणी यांची जागा सोडून, रमेश कराड यांना विधानपरिषदेचं तिकीटही दिलं होतं.

मात्र आता त्यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्याने, या मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. कारण वेळ निघून गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडे आता उमेदवारच नाही. रमेश कराड यांच्यासोबत डमी अर्ज भरलेले अशोक जगदाळे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. या मतदारसंघात भाजपने सुरेश धस यांना उमेदवारी दिली आहे. धस यांची राष्ट्रवादीने हकालपट्टी केली आहे.

पंकजा मुंडे या विधानपरिषदेच्या जागेसाठी रमेश कराड यांना उमेदवारी देण्यासाठी अनुकूल नसल्याचे बोलले जाते. रमेश कराड हे लातूर जिल्हा बँकेची निवडणूक नाणेफेकीत हरले. लातूर ग्रामीण मतदार संघातून दोन वेळा भाजपकडून निवडणूक लढवली, मात्र पदरी पराभवच पडला. रमेश कराड यांचे पंकजा मुंडेंव्यतिरिक्त भाजपातील इतर कुणाशी असे संबंध नाहीत, जे त्यांच्या मदतीला धावून येतील. याचाच फायदा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. रमेश कराड यांना उमेदवारी देत धनंजय मुंडे यांनी मोठी खेळी खेळली होती.