ईश्‍वरलाल जैन यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांना 500 रुपये दंड

0

वारंट बजावूनही न्यायालयात हजर न राहिल्याने कार्यवाही ; आंदोलन करुन जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे

जळगाव- शहरात जमाव बंदीचे आदेश लागू असतांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अजिंठा चौफुली, आकाशवाणी चौक तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एमआयडीसी तसेच जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. संबंधित पदाधिकार्‍यांना वारंट बजावूनही ते न्यायालयात हजर झाले नव्हते. त्यामुळे मंगळवारी न्यायालयासमोर हजर झालेल्या माजी खासदार ईश्‍वरलाल जैन यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकार्‍यांना न्यायालयाने 500 रुपयांच्या दंडाची कारवाई केली आहे.

आमदारांसह पदाधिकार्‍यांविरोधात गुन्हे दाखल
जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन व एमआयडीसी पोलीस ठाण्यात एक असे तीन गुन्हे दाखल करण्यात आले. यात भगत बालाणी, निलेश पाटील, गफ्फार मलिक, मनोज दयाराम चौधरी वाल्मिक विक्रम पाटील, सलीम इनामदार, गणेश बुधा सोनवणे, इब्राहीम मुसा पटेल, मिर नाजीम अली, मंगला पाटील, परेश दिलीप कोल्हे, आमदार डॉ. सतिश पाटील, अ‍ॅड. रविंद्र भैय्या पाटील, ईश्‍वर बाबुजी जैन, विशाल देवकर, अयाज अली नियाज अली यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. वारंट बजावूनही पदाधिकारी न्यायालयासमोर हजर राहत नव्हते.

ईश्‍वरबाबुजींसह देवकरपूत्र न्यायालयात हजर
पदाधिकार्‍यांना न्यायालयाने हजर राहण्याबाबत वॉरंट बजावले होते. त्यानुसार मंगळवारी जिल्हा न्यायालयात माजी खासदार ईश्‍वरबाबुजी जैन, रा.काँ अल्पसंख्यांकचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक ,रा.काँ. जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील , वाल्मिक विक्रम पाटील, मंगला पाटील, माजी महानगर अध्यक्ष परेश कोल्हे, विशाल देवकर, अयाज अली नियाज अली न्यायालयात हजर झाले. न्या. जी.जी.कांबळे यांच्या न्यायालयात कामकाज होवून त्यांना 500 रुपये तर मीर नाजीम अली यांना 300 रुपये दंड सुनावण्यात आला. हजर न झालेल्या आमदार डॉ. सतीश पाटील यांच्यासह इतरांना वॉरंट बजावण्यात आले आहे. पुढील कामकाज 21 मे व 30 मे अशा दोन दिवशी होणार आहे. पदाधिकार्‍यांतर्फे अ‍ॅड. कुणाल पाटील, अ‍ॅड. इमरान हुसेन, अ‍ॅड. अजीज शेख इमरान शेख यांनी तर सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. निखील कुळकणी यांनी कामकाज पाहिले.