मागणी करूनही चारा छावणी मिळेना ; राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांना निवेदन
जळगाव – राज्यासह जिल्ह्यात दुष्काळाची गंभीर परिस्थीती निर्माण झाली आहे. दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवडणुका आटोपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यात दुष्काळ दौरा केला. त्यांच्या पाठोपाठ प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याची विनंती केली. जिल्ह्यात देखिल राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगर शाखेतर्फे आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याची परिस्थीती अत्यंत बिकट आहे. तसेच पशुधन वाचविण्यासाठी शेतकर्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यात चारा छावण्यांची गरज असुन मागणी करूनही चारा छावण्या दिल्या जात नाही. शासनाने छावणीमध्ये जनावरांची कमाल मर्यादा 500 इतकी केली आहे. ही अट स्थानिक स्तरावर शिथील करून जनावरांना प्रत्येकी 3 किला व 1.5 किलो पेंड दर आठवड्याला देण्यात यावी. तसेच शेड उभारणे, पाणीपुरवठा, प्रकाश योजना, चारा, मुरघास याबाबींवर छावणी चालकाला मोठा खर्च सहन करावा लागतो. तरी प्रति जनावर अनुदानात वाढ करावी. यासोबतच जिल्ह्यातील दुष्काळी परिस्तीतीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे.
यांची होती उपस्थिती
जिल्हाधिकार्यांना निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलीक, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, शहराध्यक्षा नीला चौधरी, कमल पाटील, महानगराध्यक्ष नामदेव चौधरी, युवकचे अध्यक्ष अभिषेक पाटील, वाय.एस.महाजन, गजानन गव्हारे, सलीम इनामदार, अश्विनी देशमुख, किरण वाघ, नईम बशीर, जयप्रकाश चांगरे, भरत कर्डीले, ममता तडवी, पिनाझ फनीबंदा, योगेश देसले, डॉ. रिजवान खाटीक, रहीम तडवी, राजु मोरे, मंगलसिंग राजपुत आदी उपस्थित होते.