नवी दिल्ली: सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोट हवाई हल्ल्याची अचूक व यशस्वी योजना आखणारे सामंत गोयल यांची ‘रॉ’ (रिसर्च अँड अॅनालिसिस विंग)च्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, जम्मू काश्मीर विषयातील तज्ञ मानले जाणारे अरविंद कुमार यांच्याकडे आयबीच्या संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या दोघांची निवड केली असून लवकरच ते पदभार स्वीकारणार आहेत. सामंत गोयल १९८४ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत तर अरविंद कुमार १९८४ बॅचचे आसाम-मेघालय केडरचे आयपीएस अधिकारी आहेत.
सामंत गोयल यांनी बालाकोट हवाई हल्ल्याची आखणी आणि नियोजन केले होते. तर अरविंद कुमार हे आसाम-मेघालय केडरचे आयपीएस अधिकारी असून अनेक वर्षांपासून आयबीसाठी ते काम करत आहेत. देशातील नक्षलवादाला वेसण घालण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. ‘रॉ’ ही शत्रूराष्ट्रांच्या कारवायांवर लक्ष ठेवणारी गुप्तहेर संस्था आहे तर देशांतर्गत हिंसाचार, देशविरोधी कारवायांवर करडी नजर ठेवण्याची जबाबदारी ‘आयबी’वर आहे.