मुंबई| भारतीय रिझर्व्ह बँकेने अपेक्षेप्रमाणे अखेर व्याजदरात कपात केली आहे. रेपोदर 0.25 तर रिव्हर्स रेपोदरही 0.25 टक्क्यांनी कमी करण्यात आलेत. व्याजदरातील कपातीमुळे बँकांनाही आपल्या व्याजदरात कपात करावी लागेल. त्यामुळे गृह व वाहन कर्जे किंचितसे स्वस्त होतील, अशी आशा आहे. सद्या आरबीआय बँकांना देते तो व्याजदर सहा टक्के झाला असून, बँकांकडून स्वीकारल्या जाणार्या ठेवीपोटी दिला जाणारा व्याजदर 5.75 टक्के झालेला आहे. सीआरआरमध्ये मात्र शिखर बँकेने काहीही बदल केला नाही. तो पूर्वीप्रमाणेच चार टक्के कायम ठेवला आहे.
किरकोळ महागाई दर 4 टक्के राहणार
आर्थिक वर्ष 2017-18 करिता किरकोळ महागाई दर चार टक्क्यांच्या आसपास राहील, असा आरबीआयचा अंदाज आहे. केंद्र सरकारने दिलेल्या कर्जमाफीमुळे वित्तीय तूट वाढण्याची शक्यताही आरबीआयला वाटते आहे. तसेच, पुढील 18 ते 24 महिन्यांत किरकोळ महागाई दर एका टक्क्याने वाढण्याची शक्यताही बँकेने व्यक्त केली आहे. मान्सून आणि अन्नधान्याचा पुरवठा याचा किरकोळ महागाईवर परिणाम होण्याची शक्यता असून, परवडणार्या घरांना चालना देण्याची गरज आहे, त्यासाठी बांधकाम व्यवसायाला पूरक असे धोरण स्वीकारण्याची तयारीही आरबीआयने ठेवली आहे. वस्तू व सेवाकर लागू केल्यामुळे अर्थव्यवस्थेला तूर्त तरी फायदा झाला नाही, असे निरीक्षणही आरबीआयने व्यक्त केले.