आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल राजीनाम्याच्या तयारीत?

0

मुंबई-सीबीआयमध्ये केंद्र शासनाने केलेल्या हस्तक्षेपामुळे स्वायत्ततेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच मुद्द्यावरून रिझव्‍‌र्ह बँक आणि केंद्र सरकारदरम्यान तणाव वाढला असून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल हे आज बुधवारी राजीनामा देणार असल्याची चर्चा रंगली आहे. उर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्यास मोदी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रिझर्व्ह बँकेच्या धोरणावर निशाणा साधला होता. २००८ ते २०१४ दरम्यान, बँकांकडून झालेल्या अनिर्बंध कर्जवाटपाला नियंत्रित करण्यात मध्यवर्ती बँकेची भूमिका अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली होती. बँकिंग व्यवस्थेतील आजच्या बुडीत कर्जाच्या समस्येचेही खापरही त्यांनी रिझव्‍‌र्ह बँकेवर फोडले होते.

तर त्यापूर्वी रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी मुंबईतील ए.डी. श्रॉफ या व्याख्यानमालेत गेल्या आठवड्यात अर्थव्यवस्थेबाबत मध्यवर्ती बँक कायम दीर्घकालीन विचार करते, या शब्दात सरकारवर टीका केली होती. यावरुन आरबीआय आणि केंद्र सरकारमधील संबंधात तणाव असल्याचे दिसते.