जनशक्ती Reader’s letter : वाचकांचे पत्र

ते दिवस येऊच नयेत म्हणून दक्षता हवीच !
करोनाच्या संकट काळात ऑक्सिजन कमरतेमुळे रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची झालेली फरपट, होळपट कधीही विसरता येणे शक्य नाही. आणि भविष्यात तशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून शासन, पालिका प्रयत्नशील आहेत मात्र खाजगी रुग्णालयांचा ऑक्सिजन जनरेशन प्लाँट उभारण्याबाबत थंड प्रतिसाद जाणवतोय असे वाचनात आले. खाजगी रुग्णालयांचा प्रतिसाद थंड का हे जाणून घेऊन त्यांच्या अडचणी, समस्या असल्यास शासनाने त्या समजावून घेऊन अधिकाधिक खासगी रुग्णालयानाही प्लाँट उभारण्या बाबत प्रोत्साहीत करावे. ग्रामीण भागात तर त्याची अत्यंत निकड आहे. एकूण काय ऑक्सिजन कमतरतेचे ते दिवस कधीही पुन्हा दिसावयास नकोत.

विश्वनाथ पंडित, चिपळूण
————–
कमलाकरांचा भविष्यवेध
पहाटेच्या स्वप्नाला दोनवर्षं झाली.म्हणजेच महाविकास आघाडीच्या उदयाला? दोन वर्षे झाली?अर्थातच कारण,ज्यांनी सत्तेत येण्याची पहाटे स्वप्ने बघितली त्यांची स्वप्ने सूर्योदय होताच लुप्त पावली.पण,ज्यांना स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते ते मात्र सत्तेत आले.
आज कोसळणार उद्या कोसळणार म्हणता म्हणता दोन वर्षे झाली.मी पुन्हा येईन मी पुन्हा येईनचा आलाप लावणार्‍या पहाटेच्या वासुदेवांच्यापदरी मात्र घोर निराशा पदरी पडलेली आहे.बंद खोलीतील फॉर्म्युला वापरला असता तर, इथून पुढे सहामहिन्यांनी वासुदेवांचे कमळ फुलले असते.अडीच वर्षे सत्तेत असते.
आज देशभरात मरगळलेल्या पक्षांना महाराष्ट्रातील राजकारणाने उर्जितावस्था दिली.त्याचे प्रत्यन्तर
पोटनिवडणुकीत झालेल्या निकालानंतर दिसलेच आहे.तीन चाकी रिक्षा काय किंवा अन्य अनेक विशेषणांनी? महाविकास आघाडीच्या नावाने खडे फोडणार्‍या व रोजच्या रोज पडणार पडणार म्हणून भाकीत वर्तविणार्‍या
कमलाकरांचीपंचाईत झालेली आहे.तीन चाकी जरी असली तरी करोना सारख्या जागतिक महामारीला खूप मोठ्या संयमाने या रिक्षा चालकांनी प्रवास केलेला आहे.आज पडणार उद्या पडणार होता होता दोनवर्षे झाली.तशीच पुढील तीन वर्षे सुद्धा हाच आलाप ऐकता ऐकता निघून जातील.
कमलाकरांनी आता भविष्यवेध करण्यापेक्षा कमलानिवासात चिंतन शिबिर आयोजित करण्याची वेळ आली आहे.
– दत्तप्रसाद शिरोडकर , मुलुंड
—————-
ध्येय ठेवले तर, यश निश्चित मिळणार !!
भारत सरकारने स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत देशातील विविध शहरांमध्ये स्वच्छता राहावी,सुंदर शहरे निर्माण व्हावीत यासाठी मोठं – मोठ्या पुरस्कारांची घोषणा केली आहे त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेला 10 लाख ते 40 लाख लोकसंख्येच्या वर्गात देशातील स्वच्छ शहर म्हणून पाहिला क्रमांक मिळाला आहे यापूर्वीही या महानगरांने स्वच्छतेत आपली आघाडी कायम राखली आहे मात्र बृहन्मुंबई,ठाणे, पुणे,पिंपरी – चिंचवड,नागपूर या शहरांना अजूनही या अभियानामध्ये यश मिळवता आलेले नाही कारण या शहरामध्ये झपाट्याने होणारे औद्योगीकरण, शिक्षणाचे जाळे, व्यवसायिक बांधकामे,यामुळे नोकरीसाठी, विविध व्यवसायासाठी येणार्‍या लोकांची संख्या मोठ्याप्रमाणात असल्यामुळे त्यावरती नियंत्रण ठेवणे अडचणीचे ठरत असावे नागपूर हे शहर राज्याची उपराजधानी असल्यामुळे याठिकाणी जनतेचा नियमित संपर्क येतो मात्र जे स्वच्छ भारत मिशनचे निकष आहेत ते डोळ्यासमोर ठेवून त्या दिशेने वाटचाल केली आणि त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली तर निश्चितच स्वच्छ भारत मिशन या अभियानांतर्गत आघाडी घेण्यासाठी कोणतीच अडचण राहणार नाही हे मात्र नक्की !!
– राजू जाधव, मांगूर (जिल्हा.बेळगांव)