मुंबई:- जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव असा नामविस्तार करण्यासाठी अध्यादेश काढण्यासाठी शिफारस राज्यपालांकडे पाठविण्याचा निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यपालांकडे शिफारसीला अंतिम मंजुरी मिळाल्यांनतर 11 ऑगस्ट या बहिणाबाईंच्या जन्मदिनापासून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव या नव्या नावाने ओळखले जाणार आहे.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा नामविस्तार करून या विद्यापीठास थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी विविध संघटना,लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी शासनाकडे केली होती. लोकभावना लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी 22 मार्च 2018 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतची घोषणा केली होती.
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामविस्ताराचा अध्यादेश काढण्यास मान्यता देण्यात आली. या अध्यादेशानुसार हे विद्यापीठ येत्या 11 ऑगस्ट या बहिणाबाईंच्या जन्मदिनापासून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव या नव्या नावाने ओळखले जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम-२०१६ मधील अनुसूचीच्या भाग-१ मधील अनुक्रमांक 8 मध्ये तशी सुधारणा करण्यात येणार आहे.
जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीअर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. बऱ्याच वर्षांपासून विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची मागणी सर्वपक्षीय संघटना तसेच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून केली जात होती. खान्देशातील आमदार विशेषता माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी ही मागणी जोर लावून धरली होती. यासाठी अनेक संगठनांनी आंदोलने देखील केली होती. खान्देशातील शिक्षणाची पंढरी असलेल्या या विद्यापीठाला बहिणाबाईंचे नाव मिळाल्याने उत्तर महाराष्ट्रात आनंद व्यक्त केला जात आहे.