व्यावसायिक प्रयोजनासाठी परवानगी प्रस्तावित व मंजूर झालेल्या परवानगी यांच्या चौकशी होण्याबाबत नगरसेवकांनी चक्क स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच नगरपंचायत कार्यालयाच्या आवारात उपोषण
प्रतिनिधी / मुक्ताईनगर : मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीतील बिनशेती रहिवास प्रयोजन तसेच व्यावसायिक प्रयोजनासाठी परवानगी प्रस्तावित व मंजूर झालेल्या परवानगी यांच्या चौकशी होण्याबाबत नगरसेवकांनी चक्क स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच नगरपंचायत कार्यालयाच्या आवारात उपोषण केले.
नगरपंचायत हद्दीतील बऱ्याच शेतकऱ्यांना बिन शेती परवानगी देण्यात आले असून काही परवानगी प्रस्तावित आहेत सदर दिलेल्या परवानग्यांमध्ये शासकीय नियमानुसार बऱ्याच त्रुटी असून एनए धारकांनी स्थानिक प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना हाताशी धरून एन ए परवानगी मिळवलेली आहे व काही प्रस्तावित आहेत सदर प्रकरणाबाबत दखल घेऊन चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलकांनी नगरसेवकांनी नगरपंचायत च्या प्रांगणातच उपोषण केले.
दरम्यान आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपोषण स्थळी भेट देऊन नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतले. प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील , तहसीलदार निकेतन वाळे, मुख्याधिकारी गजानन तायडे हे देखील उपस्थित होते.दुपारी प्रांताधिकारी पाटील यांनी येऊन नगरसेवकांच्या रास्त मागण्या असून त्या संदर्भात तात्काळ चौकशी करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.
येथील नगरपंचायत च्या लोकनियुक्त नगराध्यक्षा नजमा तडवी यांनी जात वैधता प्रमाणपत्र मुदतीच्या आत सादर न केल्याने गेल्या दीड वर्षापासून अपात्रतेच्या फेऱ्यात अडकलेल्या होत्या या दरम्यान येथे उपनगराध्यक्षाकडे प्रभारी नगराध्यक्ष पदाचा आल्यापासून केवळ प्रशासकीय काम काजाच्या विशेष बैठका लावण्यात आल्या तर शिवसेनेच्या गटाकडून विविध कामांचे ठराव घेणे संदर्भात वारंवार मागणी करूनही प्रभारी नगराध्यक्ष यांनी सर्व साधारण बैठक आयोजित न करण्याचे राजकीय सूड बुद्धीचे धोरण अवलंबिले असा आरोप सेनेच्या १० नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत केलेला होता. तर कोणत्याही विकास कामांसाठी नगर पंचायतीची ना हरकत व ठराव आवश्यक असल्याने सुमारे 30 कोटीच्या जवळपास च्या विविध विकास कामांचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्र नगरपंचायत विभागात धूळ खात पडलेले होते.
दरम्यान , दि.17 ऑगष्ट रोजी नगरपंचायतीचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने, विविध विकास कामांना पालिकेची ना हरकत मिळते की नाही अशी सांशकता होती, परंतु अपात्रतेच्या प्रकरणात नुकतीच नजमा तडवी यांना स्थगिती मिळाल्याने त्या पुन्हा नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्यावर येताच त्यांनी शहरातील विविध नागरी समस्यांचा आढावा घेतला असता, त्यांना जी कामे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंजूर करून आणलेली आहेत त्याच कामांना ठराव व इतर बाबींमुळे अडचणी येत असल्याने नागरिकांना गटारी, रस्ते या मूलभूत समस्यांपासून वंचित रहावे लागत असल्याचे दिसून येताच त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त विविध पत्रांच्या अनुषंगाने सर्वसाधारण बैठकीचे आयोजन केलेले होते.या बैठकीत सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.
@@@— डी पी आर प्लॅन मंजुरी बाकी असतांना अनधिकृत एन ए परवानग्या -……
तत्कालीन ग्रामपंचायतचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर या शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार होणे बाकी आहे. काही ठिकाणी स्मशानभूमीच्या बाजूलाच बिन शेती परवानगी दिलेली आहे. पुनर्वसन च्या चौथ्या टप्प्याची मंजुरी अंतिम टप्प्यात आलेली आहे. तसेच बोदवड उपसा सिंचन योजने मोठ मोठे पाईप ज्या जमिनीतून जाणार आहेत त्या जमिनीवर नगरपंचायत प्रशासनानेच कुठली ही एन ए व बांधकाम परवानगी देण्यात येणार नसल्याचा मनाई आदेश वृत्तमाध्यमात जाहिरात द्वारे प्रसिद्ध केला. असल्यावरही येथे एन ए परवानग्या कशा दिल्या ? आणि संत भूमी तीर्थक्षेत्र असल्याने येथे शिर्डी पॅटर्न प्रमाणे विकास कामे करणे अत्यंत गरजेचे असताना यासाठी काही जागांवर आरक्षण टाकणे महत्त्वाचे होते, परंतु कोरोना काळ आणि नगराध्यक्ष पदाचे अपात्रतेचे प्रकरण यात गेलेला दीर्घ कालावधी यात काही नगर पंचायतीचे काही लोकप्रतिनिधी व नगरपंचायत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी. अर्थपूर्ण व्यवहारातून अनधिकृत रीत्या सुमारे 26 भूखंडांवर कुठल्याही नागरी सुविधा नसताना बिनशेती एन ए परवानगी बहाल केलेल्या आहेत या सर्व अनधिकृत असल्याचा आरोप करण्यात आला तर प्रशासन ही सभागृहात उत्तरे देवू शकली नाही. यावरून मात्र सर्व साधारण सभा वादळी ठरली. तर दिनांक 17 ऑगस्ट रोजी पुन्हा विशेष बैठकीचे आयोजन करून दिलेल्या अनधिकृत परवानग्या संदर्भात विषय अजेंड्यावर चर्चा विनिमय करण्याचे ललित महाजन व संतोष मराठे यांनी सुचवले त्यानुसार नगराध्यक्ष तडवी यांनी लागलीच 17 तारखेचा विशेष सभेचा अजेंडा काढून त्यावर येणे संदर्भातील विषय घेण्यात आलेला असल्याने आता पालिका सभागृहात या संदर्भात काय चर्चा घडते व कोणता ठराव केला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
यांची होती उपस्थिती : …….
नगराध्यक्ष नजमा तडवी, गटनेता नगरसेवक निलेश शिरसाट, गटनेता, नगरसेवक राजेंद्र हिवराळे, उपगटनेता संतोष कोळी, उपगटनेता संतोष मराठे, नगरसेवक मुकेशचंद्र वानखेडे, पियूष मोरे, सविता भलभले, शाबनाबी अब्दुल आरिफ, बिलकिसबी अमानउल्ला खान, नुसरत बी महेबुब खान ,तसेच स्वीकृत नगरसेवक ललित महाजन आदींची उपस्थिती होती.