लंडन-ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांचा ब्रेग्झिट करारावर पराभव झाला होता. त्यानंतर आता त्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. सरकारविरोधात मांडण्यात आलेला अविश्वास ठराव नामंजूर झाला आहे. फक्त १९ मतांच्या फरकाने थेरेसा मे यांना सरकार वाचवण्यात यश आले असून यामुळे विरोधकांची पुन्हा सार्वत्रिक निवडणुका घेण्याची योजना फसली आहे. अविश्वास ठराव मंजूर झाला असता तर १४ दिवसांत पर्यायी सरकार बनवावे लागले असते.
विरोधी पक्षनेते, मजूर पक्षाचे जेरमी कोर्बीन यांनी अविश्वास प्रस्ताव मांडला होता. यावेळी ३०६ जणांनी ठरावाच्या बाजूने तर ३२५ खासदारांनी विरोधात मतदान केले. डिसेंबरमध्ये स्वत:च्या हुजूर पक्षाच्या खासदारांनी दाखल केलेला अविश्वास ठराव फेटाळण्यात यशस्वी झालेल्या थेरेसा मे यांना पुन्हा अशा ठरावाला सामोरे जावे लागले. याआधी बोलताना थेरेसा मे यांनी अविश्वास ठराव फेटाळला गेल्यास पुढील आठवड्यात पुन्हा पर्याय घेऊन सभागृहात येऊ असे सांगितले होते.
ब्रेग्झिटबाबत पंतप्रधान थेरेसा मे यांना पुन्हा धक्का बसला होता जेव्हा संसदेत त्यांना ४३३ विरुद्ध २०२ असा मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. ब्रिटनच्या जनतेने २०१६ मध्ये ब्रेग्झिटच्या बाजूने निसटता कौल दिल्यानंतर पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या थेरेसा मे यांनी युरोपीय महासंघाशी दोन वर्ष वाटाघाटी केल्या. त्यासंदर्भातील ब्रेग्झिट करारावर मंगळवारी मध्यरात्री ब्रिटीश पार्लमेंटच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये मतदान झाले. त्यात ४३२ विरुद्ध २०२ मतांनी पराभव होऊन हा करार फेटाळण्यात आला.