भारतीय खेळाडूंना मिळत असलेले मानधन काहीच नाही!

0

मुंबई। भारतीय खेळाडूंच्या मानधनावरून सध्या घमासान उठले आहे. काही खेळाडूंनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता भारतीय संघाचे माजी व्यवस्थापक रवी शास्त्री यांनी देखील या वादात उडी घेतली आहे. भारतीय खेळाडूंच्या मानधनात यंदा दुपटीने वाढ करण्यात आली आहे. मात्र रवी शास्त्री यांनी या मानधन वाढीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय खेळाडूंना मिळत असलेले मानधन काहीच नसल्याचे त्यांचे मत आहे. ’दोन कोटी रुपये अतिशय कमी आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना किती पैसे मिळत आहेत,’ अशा शब्दांमध्ये रवी शास्त्री यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मानधन वाढ तुटपुंजी
गेल्या महिन्यात बीसीसीआयकडून अ, ब आणि क गटातील खेळाडूंचे मानधन दुप्पट केले होते. अ गटातील खेळाडूंना 2 कोटी, ब गटातील खेळाडूंना 1 कोटी, तर क गटातील खेळाडूंना 50 लाख रुपये मानधन देण्यात येणार आहे. तसेच बीसीसीआय प्रत्येक कसोटीसाठी 15 लाख , एकदिवसीयसाठी 6 लाख आणि टी-20 साठी 3 लाख इतके मानधन देण्यात येणार आहे. मानधनात दुप्पट वाढ होऊनही भारतीय क्रिकेटपटूंकडून करण्यात येत असलेल्या अधिक मानधनाच्या मागणीचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी समर्थन केले आहे. बीसीसीआयकडून क्रिकेटपटूंना देण्यात आलेली मानधन वाढ तुटपुंजी असल्याचे रवी शास्त्री यांनी म्हटले आहे.

आज होणार बैठक
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही सोमवारी खेळाडूंच्या मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती. अ गटातील खेळाडूंना 2 कोटींऐवजी किमान 5 कोटी दिले जावेत, असे कोहलीने म्हटले होते. विराटने केलेल्या या मागणीचा विचार करू असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे. बीसीसीआयच्या प्रशासक समितीने येत्या 5 एप्रिल रोजी बैठक घेऊन या वादावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असून खेळाडूंना आयपीएलचे सत्र संपेपर्यंत वाट पाहण्यास सांगितले आहे. कर्णधाराच्या या मागणीने बीसीसीआयला आश्चर्याचा धक्का बसला असल्याचे सांगितले जात आहे.