नाना पाटेकर, तनुश्री दत्ता वाद: रेणुका शहाणेंनी घेतली तनुश्रीची बाजू

0

मुंबई- आशिक बनाया फेम अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकरवर गैरवर्तन केल्याचा आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. या वादावर बॉलिवूड दोन गटात विभागले आहे. काहींना नानाला पाठींबा दिला आहे तर अनेकजण तनुश्रीच्या पाठीशी आहे. आता अभिनेत्री रेणुका शहाणे हिने तनुश्रीला पाठींबा देत, फेसबुकवर एक खुले पत्र लिहिले आहे.

मी, नाना किंवा तनुश्रीसोबत कधीही काम केलेले नाही किंवा ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटातही मी नव्हते. परंतु तनुश्रीच्या या प्रकरणात अनेक असे मुद्दे आहेत, जे मी स्वत:शी जोडूू शकते. तनुश्रीला संबंधित गाण्याची स्टेप अडचणीची वाटत होती. त्यामधील नानाचे हावभाव किंबहुना त्याचा स्पर्श तिला आवडला नव्हता. कदाचित तनुश्रीसोबत गैरवर्तन करण्याचा नानाचा उद्देश नसेलही, पण तरीही तनुश्रीला एखादी स्टेप अडचणीची वाटत असेल तर त्यात बदल करणे गरजेचे होते. तनुश्री ही तिथे उपस्थित असलेल्या एखाद्याची मुलगी असती तर तिच्यासोबतही असेच घडले असते का ? कदाचित स्वत:ची मुलगी आणि दुस-याची मुलगी यातील हाच फरक असावा, असे रेणुकाने लिहिले आहे.

रेणुकाने पुढे नानावर अप्रत्यक्षणपणे टीका केली आहे. लिहिलंय, ‘एका मुलीच्या विरोधात चार पुरूष पुरेसे नव्हते; कदाचित म्म्हणून तिची गाडी फोडण्यासाठी एका राजकीय पक्षाच्या लोकांना पाचारण करण्यात आले़ तिच्या आई वडिलांना धमक्या दिल्या गेल्या. एका घटनेवर ही ओव्हर रिअ‍ॅक्शन नव्हती का? तनुश्रीने तथाकथित ‘महाराष्ट्राला गर्व’ असलेल्याची माफी मागावी, असे त्या राजकीय पक्षाचे म्हणणे होते. एका महिलेसोबत असे वागून खरंच महाराष्ट्राचा ‘गर्व‘ वाढला का ? घटनास्थळी असलेल्या कोणत्याच पुरूषाचे या घटनेनंतर काहीच बिघडले नाही. त्यांचा मीपणा जिंकला. पुरुषांना प्रत्येक इंडस्ट्रीकडून पाठींबा मिळाला. या घटनेचा सर्वात जास्त परिणाम झाला असेल, तो तनुश्रीवर. तिचे करिअर ध्वस्त झाले. तिची जखम अजून भरलेली नाही,’ असे तिने म्हटले आहे.’