नवी दिल्ली-देशातील उत्पादन क्षेत्राची कामगिरी मे महिन्यामध्ये अल्पशी का होईना ढासळल्याचे आढळून आले आहे. ‘निक्केई इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडिया’ अर्थात ‘पीएमआय’च्या दरमहा सर्वेक्षणात ही बाब आढळून आली आहे. या पार्श्वभूमीवर महागाईच्या वाढत्या दबावाखाली रिझर्व्ह बँकेतर्फे आगामी पतधोरण आढाव्यात व्याजदर वाढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
‘पीएमआय’ ५० अंकांच्या वर
मे महिन्याचा उत्पादन निर्देशांक (पीएमआय) घसरून ५१.२ वर पोहोचला. तोच एप्रिलमध्ये ५१.६ वर होता. ‘आयएचएस मार्केट’च्या अर्थतज्ज्ञ आशना ढोलकिया यांनी दिलेल्या माहितीनुसार ताज्या ‘पीएमआय’ निर्देशांकातून उत्पादन क्षेत्राची स्थिती हळूहळू का होईना पूर्वपदावर येत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, अद्याप आउटपूट, नवा व्यवयाय आणि रोजगार निर्मितीची संधी या क्षेत्रांमध्ये अद्याप वाढीस वाव असल्याचे आढळून आले आहे. तरीही सलग दहाव्या महिन्यात ‘पीएमआय’ ५० अंकांच्या वर असल्याचेही आढळून आले आहे.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असल्यामुळे उत्पादनांच्या किमतीत वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. ढोलकिया यांच्या मते देशाच्या एकूण गरजेपैकी एक तृतीयांश कच्चे तेल आयात होत असल्यामुळे वित्तीय तुटीत वाढ होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे.
रुपया घसरणार?
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे भारतीय रुपया आणखी घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे चालू खात्यातील तूट मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. महागाई रोखण्यासाठी आणि वित्तीय स्थिरता कायम ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेतर्फे आगामी पतधोरण आढाव्यात व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने एप्रिल महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या पतधोरण आढाव्यात रेपो दर ६ टक्क्यांवर ‘जैसे थे’च ठेवण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी ऑगस्टनंतर रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.