महसूल कर्मचार्‍यांच्या बेमुदत संपास सुरवात

0

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, धरणे आंदोलन

जळगाव :- महसूल कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांना ६ वर्षांचा कालावधी होवूनही त्याबाबत शासनाकडून अद्यापपावेतो कोणताही शासननिर्णय निर्गमीत झालेला नाही. तथापी शासनाने याबाबत त्वरीत कार्यवाही न केल्यास संघटनेच्या आंदोलनाची रुपरेषा निश्चीत करण्यात आलेली आहे. या आंदोलनाच्या सर्वात महत्वाच्या व अंतिम टप्प्यानुसार जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे आजपासुन बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे. शासनाकडून आपल्या तत्वत: मंजूर करण्यात आलेल्या मागण्या पूर्ण होण्याच्या दृष्टीने हा सर्वात महत्वाचा व अंतिम टप्पा असल्याने या बेमुदत संपात जिल्ह्यातील सर्व पंधरा तालुके, सात उपविभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांमधील सर्व महसूल कर्मचारी सहभागी झालेले आहेत. आंदोलनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करुन, घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर संघटनेच्या प्रलंबित मागण्यांबाबत जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांना निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील लिपीक, अवल कारकून, नायब तहसीलदार संवर्गातील ५७७ कर्मचार्‍यांनी या संपात सहभाग घेतला.
महसूल कर्मचारी संघटनेच्या शासनाकडून तत्वत: मान्य झालेल्या परंतु शासन निर्णय निर्गमीत न झालेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत- महसूल लिपिकाचे पदनाम बदलून महसूल सहाय्यक करणे, अव्वल कारकून (वर्ग-३) च्या वेतन श्रेणीतील तृटी दूर करणे, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देणे, आकृती बंधात दांगट समिती अहवालानुसार पदे मंजूर करणे, इतर विभागाचे कामासाठी (संगायो, रोहयो, गौण खनिज, जातप्रमाणपत्र इ.) नव्याने आकृतीबंध तयार करणे, एमपीएससी परिक्षेत नायब तहसिलदार व उपजिल्हाधिकारी पदासाठी महसूल कर्मचार्‍यांसाठी ५ टक्के जागा आरक्षित ठेवणे, ना.तह. संवर्गातील सरळसेवा भरतीचे प्रमाण ३३ टक्के वरुन २० टक्के करणे. या व इतर मागण्या आहेत.

संपात यांचा सहभाग
या प्रसंगी राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष तथा जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शैलेश परदेशी, कार्याध्यक्ष योगेश नन्नवरे, उपाध्यक्षी रविंद्र माळी, कोषाध्यक्ष सुयोग कुलकर्णी, सहकार्याध्यक्ष दिनकर मराठे, ज्येष्ठ सदस्य तथा मार्गदर्शक दिलीप बारी, सुधीर सोनवणे, रविंद्र उगले, प्रसिध्दी प्रमुख अजय कुलकर्णी, अमित दुसाने, हे उपस्थित होते. राज्य मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मगन पाटील, सरचिटणीस अमर परदेशी, समन्वय समिती चेअरमन सर्जेराव बेडीसकर याप्रसंगी आंदोलन स्थळी पाठींबा देण्यासाठी हजर होते. महिला प्रतिनिधी प्रिया देवळे, रेखा चंदनकर, गिता शिंदे, छाया तडवी, नम्रता नेवे तसेच संघटनेचे सर्व जिल्हा, उपविभाग व तालुका स्तरीय सर्व पदाधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयाचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने संपात सहभागी झाले आहेत.


कार्यालयांमध्ये शुकशुकाट
महसूल कर्मचार्‍यांनी आजपासून बेमुदत संप पुकारल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, तालुकास्तरावरील कार्यालयांमध्ये कर्मचार्‍यांअभावी शुकशुकाट दिसून आला.