मेहरुण परिसरातून दोन गोर्यासह वासरु पळविले ; गेल्या काही वर्षांमध्ये अनेक घटना, पोलिसात तक्रारही दाखल मात्र गुरे मिळेनात ? ; गुरे व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर
जळगाव- गोठ्यात गुरांच्या रक्षणार्थ पाळलेल्या लॅब्रॉडॉर जातीच्या पाळीव कुत्र्याला खाद्यपदार्थातून गुंगीचे औषध देवून बेशुध्द करत चोरट्यांनी मोकळी असलेली गोर्यासह वासरु चारचाकीतून लांबविल्याची धक्कादायक घटना मेहरुण परिसरात मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. या गोठ्यात असलेल्या वृध्द महिलेला इतर गावठी ेकुत्र्यांच्या भुंकण्याने जाग आली, तेव्हा काही अंतरावर उभी असलेल्या पांढर्या चारचाकीतून तीन ते चार जण गुरांना टाकत असल्याचे तिने बघितले. दरम्यान लॅब्रॉडॉर भुंकण्यातून विरोध करत असल्याने चोरट्यांनी त्याला मारुन टाकल्याचा संशयही गुरे व्यावसायिकाने व्यक्त केला आहे.
मेहरुण परिसरातील महादेव मंदिरासमोर अपूर्णा अवस्थेतील घरकुले आहेत. घरकुलांच्या परिसरात मोकळ्या जागेत अनेक शेतकरी, पशुपालक आपली म्हशींसह गुरे बांधतात. अनेकांची याचठिकाणी गुरे बांधण्यासाठी गोठेही आहेत. याच परिसरात समाधान जगदीश नाईक रा. साईबाबा मंदिर परिसर, मेहरुण हे सुध्दा त्यांची गुरे बांधतात. त्यांच्याकडे दोन गायी तसेच गोर्हा व वासरु अशी गुरे होती. गुरे ज्या ठिकाणी बांधतात त्याठिकाणी त्यांची वृध्द आई झोपते तर याच ठिकाणाहून हाकेच्या अंतरावर असलेल्या घरी समाधान नाईक झोपतात.
बांधलेल्या असल्याने दोन गायी सुरक्षित
गुरुवारी मध्यरात्री 1 ते दीड वाजेच्या यांच्याकडे गोठ्यापासून काही अंतरावर चोरट्यांनी वाहन उभे केले. यानंतर त्यांनी गोठ्याजवळ नेहमीप्रमाणे दोन गायी बांधलेल्या तर गोर्हा व वासरु मोकळे होते. याच ठिकाणी गुरांच्या संरक्षणार्थ लॅब्रॉडॉर जातीचा पाळीव कुत्राही मोकळा होता. चोरट्यांनी काहीतरी खाद्यपदार्थ देवून लॅब्रॉडॉरला बेशुध्द केले. यानंतर मोकळे असलेले गोर्हा व वासरु पळविले. इतर पाळीव गावठी कुत्र्यांचा आवाज आल्याने गोठ्यात झोपलेल्या मंगला यांना जाग आली. बाहेर आल्यावर त्यांना गोठ्यापासून काही अंतरावर पांढर्या रंगाची चारचाकी उभी होती व त्यात दोन ते तीन जण गुरे टाकत असल्याचे दिसले. त्यांनी समाधान यांनाही उठविले मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. दरम्यान बांधलेल्या असल्याने दोन गायी सुरक्षित राहिल्याचेही नाईक यांनी सांगितले.
5 वर्षाच्या लॅब्रॉडार बेशुध्द केले की मारले?
याच परिसरात गेल्या काही वर्षांमध्ये अनेकदा गुरे चोरीच्या घटना घडल्याने गुरांच्या रक्षणार्थ समाधान नाईक यांनी पाळीव कुत्रेही पाळले असून कुत्र्यांची भयंकर जात म्हणून ओळखल्या जाणार्या लॅब्रॉडॉरही चार ते पाच वर्षांपूर्वी विकत घेतला होता. सहजासहजी मोकळ्या असलेल्या लॅब्रॉडॉरच्या तावडीतून गुरे पळविणे शक्य नाही, त्यामुळे एकतर चोरट्यांनी त्याला खाद्यपदार्थ देवून बेशुध्द केले असावे, व अथवा जीवे मारले असावे, अशी शक्यता नाईक यांनी व्यक्त केली असून चोरटे गुरांसह लॅब्रॉडारही सोबत घेवून गेल्याचे नाईक यांनी सांगितले. लहानपणापासून पाळला असल्याने लॅब्रॉडॉरला लळा लागला होता. त्यामुळे समाधान नाईक बुलढाणा यासह अनेक ठिकाणी फिरण्यास गेल्यावर असता चारचाकीच्या मागे थेटपासून कुत्रा परत आला आहे. त्यामुळे कुत्रा जर जिवंत असता व मोकळा असता तो तर कुठुनही परत आला असता, एकतर त्याला मारले असावे, अन्यथा जीवंत असेल तर त्याला बांधून ठेवले असावे, अशीही शक्यता नाईक यांनी वर्तविली आहे.
आणखी एका ठिकाणाहून गोर्हा लांबविला
गुर्हे घेवून जाण्यासाठी सोयीस्कर व्हावे म्हणून चोरट्यांनी महामार्गाच्या बाजूने वाहन लावले. नाईक यांच्या गुरे गाडीत कोंबल्यावर नाईक यांच्या गोठ्यापासून काही अंतरावर मेहरुमधील सत्तार नामक एकाचा गोर्हाही चोरट्यांनी लांबविल्याचे शुक्रवारी समोर आले. नाईक यांनी त्यांच्या गुरे चोरीबाबत एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली आहे. दरम्यान या परिसरात अनेकदा गुरे चोरीच्या घडतात मात्र पोलिसात तक्रार देवूनही गुरे पुन्हा परत मिळाली नाही, त्यामुळे अनेक जण तक्रार देणेही टाळत असल्याचे येथील पशुपालकांनी सांगितले. तर या गुरे चोरणारी टोळी एकच असल्याची शक्यताही व्यक्त केली असून टोळीचा शोध लावावा, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे.