रॉबर्ट वड्रांना लंडन वगळता परदेशात जाण्यास परवानगी

0

नवी दिल्ली : मनी लाँड्रिंगप्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात असलेले काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रांना उपचारांसाठी सहा आठवडे परदेशात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. सीबीआय विशेष न्यायालयामध्ये वड्रांच्या वकिलाने परदेशात जाण्याची अनुमती मागितली होती. यावर ईडी आणि सीबीआयने आक्षेप घेतला होता. मात्र, वैद्यकीय कारणासाठी न्यायालयाने वड्रांना परवानगी दिली आहे. न्यायालयाने अमेरिका, नेदरलँडला जाण्याची परवानगी दिली आहे, मात्र लंडनला जाण्याची विनंती फेटाळली आहे. यामुळे वड्रा यांनी ही मागणी मागे घेतली आहे. यानंतर न्यायालयाने त्यांच्याविरोधात काढण्यात आलेली लूक आऊट नोटीस या सहा आठवड्यांच्या काळात निलंबित राहणार असल्याचे म्हटले आहे.

परदेशात अवैध संपत्ती खरेदी केल्याप्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांनी गुरुवारी चौकशीसाठी हजर राहावे, असे समन्स ईडीने नव्याने बजावले आहेत. वाड्रा यांनी ईडीच्या तपास अधिकाऱ्यांपुढे हजर राहावे लागणार आहे. त्यांनी या प्रकरणात अटकपूर्व जामीन घेतला आहे. गेल्या आठवड्यात ईडीने दिल्ली उच्च न्यायालयास हा जामीन रद्द करावा, असा अर्ज केला होता. त्यावर न्यायालयाने वाड्रा यांना त्यांची बाजू मांडण्याचे आदेश दिले होते. ईडीने आपणास याच खटल्यात अनेकदा गुंतविल्याचा वाड्रा यांचा दावा आहे, तर तपासात सहकार्य करत नसल्याने त्यांना ताब्यात घेणे आवश्यक आहे, असे ईडीचे म्हणणे आहे.