चंदीगढ-जमीन खरेदीतील कथित अनियमततेविरोधात काँग्रेसच्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हरयाणातील गुरुग्राम येथे गृहसंकूल व व्यापारी संकुले उभारण्यासाठी केलेल्या जमीन खरेदी प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रॉबर्ट वड्रा यांच्यासह हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुडा यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. या एफआयआरमध्ये दोन रियल इस्टेट कंपन्यांचीही नावे असल्याची माहिती आहे. या प्रकरणी वड्रा यांच्याविरुद्ध फसवणुकीच्या 420 कलमासह विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.
या व्यवहारात वड्रा यांनी 50 कोटींचा लाभ उठविल्याचा आरोप आहे. स्वस्त दरात जमीन खरेदी करून सरकारच्या मदतीने जास्त दरात विकण्याचा आरोप वाड्रांच्या स्कायलाईट कंपनीवर होता.
हरयाणातील भाजप सरकारने यापूर्वीच या जमीनखरेदी व्यवहाराची चौकशी करण्यासाठी आयोगाची स्थापना केली आहे. हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्या प्रचाराचा हा प्रमुख मुद्दा केला होता. वड्रा, हुडा या दोघांसह स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी आणि डीएलएफ या कंपन्यांच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेचे कलम 420, 120 ब, 476, 468 आणि 471 अन्वये वडेरा यांच्याविरुद्ध केस दाखल केली आहे.