रांची: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सध्या सुरू असलेल्या मालिकेतील आजपासून सुरु झालेल्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्याच डावात ‘हिटमॅन’ रोहित शर्माने शतक ठोकले आहे. ‘हिटमॅन’चे मालिकेतील हे तिसरे तर, कारकिर्दीतील सहावे कसोटी शतक आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून संधी मिळालेला ‘हिटमॅन’ने आपली निवड सार्थ ठरवली आहे.
रोहितनं क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतकं ठोकण्याची किमया केली आहे. या यादीत रोहितसह वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल, न्यूझीलंडचा ब्रँडन मॅक्कलम, मार्टिन गप्टिल, श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान, पाकिस्तानचा अहमद शहजाद, ऑस्ट्रेलियाचे शेन वॉटसन आणि बांगलादेशचा तमीम इकबाल यांचा समावेश आहे. गेल यांनी सलामीवीर म्हणून कसोटीत १५, एकदिवसीय सामन्यात २५ आणि टी-२० मध्ये दोन शतकं ठोकली आहेत.
तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून मालिका खिशात घातल्यानंतर आज भारतीय संघ आत्मविश्वासने मैदानात उतरला होता. मात्र, सलामीवीर मयांक अग्रवाल अवघ्या १० धावा करून तंबूत परतला. त्यानंतर आलेला चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाला. तर, कर्णधार विराट कोहलीही १२ धावा करून परतला. त्यामुळे एकेवेळी भारताची अवस्था ३ बाद ३९ अशी झाली होती. एका बाजूला अशी पडझड होत असताना दुसऱ्या बाजूने रोहितने किल्ला लढवत शतक साकारले. १३० चेंडूंमध्ये त्यानं हे शतक साजरे केले. त्यात चार षटकार आणि १३ चौकारांचा समावेश होता. अजिंक्य रहाणेनं त्याला उत्तम साथ दिली. रोहित आणि रहाणेच्या भागीदारीच्या जोरावर भारताने २०० धावांचा टप्पा ओलांडला आहे.