नवी दिल्ली:उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन.डी.तिवारी यांचे पुत्र रोहित शेखर यांच्या रहस्यमयी मृत्युनंतर तपासणी सुरु होती. त्यांचा मृत्यू गळादाबून झाल्याचा शवविच्छेदनातून समोर आले होते. अखेर हत्येप्रकरणी शेखर यांची पत्नी अपूर्वा शुक्ला यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. अपूर्वा यांच्या विरोधात ठोस पुरावे मिळाल्यानंतरच पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली. १६ एप्रिल या दिवशी आपल्या बंगल्यातील एका खोलीत रोहित मृतावस्थेत आढळले होते. हे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या पत्नी अपूर्वा यांची अनेक तास चौकशी केली होती.
या प्रकरणी चौकशी करत असताना पोलिसांना अपूर्वा शुक्ला यांच्या व्यतिरिक्त घरात उपस्थित मदतनीसांचे जबाबही संशयास्पद वाटले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासल्यानंतर अपूर्वा पहिल्या मजल्यावर जात असल्याचे पोलिसांना आढळले. घरातील मदतनीसांनी मात्र आपल्या जबाबात अपूर्वा या रात्री २.३० वाजेपर्यंत टीव्हीवर मालिका बघत असल्याचे म्हटले होते. या मुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. रोहितचा हा नैसर्गिक मृत्यू असल्याचे रोहित यांच्या आईने सुरुवातीला म्हटले होते. मात्र, पुढे अधिक चौकशी केल्यानंतर रोहित आणि पत्नी अपूर्वा यांच्यामध्ये भांडण झाल्याचे रोहित यांच्या आईने पोलिसांनी सांगितले. अपूर्वा या पती रोहितवर संशय घ्यायच्या आणि या मुळे दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता असे गुन्हे शाखेनेही तपासादरम्यान म्हटले होते. अपूर्वा यांना रोहित यांचा जवळच्या नातेवाईक महिलेशी संबंध असल्याचा संशय होता.