नवी दिल्ली-आयसिस या दहशतवादी संघटनेने ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी या दिग्गज फुटबॉ़लपटूंचा शिरच्छेद करण्याची धमकी दिली आहे. आयसिसच्या टेलिग्रामवरील एका ग्रुपवर धमकीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
पुढील महिन्यापासून वर्ल्डकप
रशियात पुढील महिन्यापासून फुटबॉल वर्ल्डकपला सुरुवात होणार असून काही दिवसांपूर्वीच आयसिसने रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना धमकी दिली होती. ‘सीरियातील मुस्लिमांच्या हत्येचा बदला घेतला जाईल’, असे आयसिसने म्हटले होते. आयसिसने एक फोटो देखील जाहीर केला होता. या फोटोत रशियातील फुटबॉल मैदानात एक दहशतवादी हातात एके ४७ बंदुक घेऊन उभा असल्याचे दाखवण्यात आले होते. सीरियात राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद यांना रशियाचा पाठिंबा असून आयसिसविरोधातील लढ्यात त्यांना रशियाने लष्करी मदत केली आहे. या पार्श्वभूमीवर आयसिसने हा इशारा दिला होता. गेल्या महिन्यात रशियातील सुरक्षा यंत्रणांनी ११ आयसिस समर्थकांचा चकमकीत खात्मा केला होता.
‘टेलिग्राम’वर आला व्हिडीओ
आयसिसने आता ‘टेलिग्राम’ या मेसेजिंग अॅपवरील एका ग्रुपवर धमकीचा नवा व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओत आयसिसचे दहशतवादी रोनाल्डो आणि मेस्सीचा शिरच्छेद करतानाच मॉर्फ केलेला फोटो आहे. हे हल्ले करायला मोठ्या गटाची आवश्यकता नसून आमचे हल्लेखोर एकेकट्याने हल्ले करण्यास सक्षम आहे, असेही आयसिसने म्हटले आहे. आयसिसच्या या व्हिडिओनंतर रशियात होणाऱ्या फुटबॉल वर्ल्डकपमधील सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवण्यात आली आहे.