अजून एक 800 कोटींचा कर्ज घोटाळा

0

कानपूर : पीएनबी घोटाळा ताजा असतानाच देशातील पेन बनवणारी मोठी कंपनी रोटोमॅकचाही 800 कोटींचा कर्ज घोटाळा समोर आला आहे. सीबीआयने रोटोमॅकविरोधात गुन्हा दाखल केला असून छापेमारी सुरु केली आहे. बँक ऑफ बडोदाच्या तक्रारीनंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला. कानपूरमध्ये तीन ठिकाणी छापेमारी करण्यात आली.

रोटोमॅकचे मालक विक्रम कोठारी यांनी सरकारी बँकांकडून जवळपास 800 कोटी रुपयांचं कर्ज एक वर्षापूर्वी घेतलं होतं. मात्र अजूनही ते भरलेलं नाही. कानपूरच्या टिळक नगरमध्ये विक्रम कोठारीचा आलिशान बंगला आहे, मात्र ते सध्या बंगल्यात राहत नाहीत. तर पनकी दादा नगर भागात कारखाना आहे, जो बंद आहे. कानपूरच्या माल रोडच्या सिटी सेंटरमध्ये रोटोमॅकचं कार्यालय आहे, तेही सध्या बंद अवस्थेत आहे.

युनियन बँक ऑफ इंडिया आणि अलाहाबाद बँकेच्या सूत्रांच्या सांगण्यानुसार, कोठारी यांनी कर्जाच्या रकमेचं व्याजही दिलं नाही. कोठारी यांना कर्ज देताना बँकेच्या नियमांमध्ये तडजोड केल्या असल्याचंही सांगण्यात येत आहे.