पोकलॅण्ड, श्रमदानासह दिला सहभाग ; 750 एकर शेत जमीनीला आणि गाडेगाव व नेरी येथील शेतकरी, ग्रामस्थांना याचा फायदा होणार
जळगाव : येथील रोटरी क्लब जळगाव वेस्टने आदर्शगाव गाडेगाव मधील शिवनाला खोलीकरणासाठी पोकलॅण्ड व श्रमदानासह सक्रीय सहभाग देऊन पाणी टंचाई व दुष्काळ या विषयी सामाजिक कार्याचे शिवधनुष्य उचलले. या श्रमदानाचा 750 एकर शेत जमीनीला आणि गाडेगाव व नेरी येथील शेतकरी, ग्रामस्थांना याचा फायदा होणार आहे. तसेच परिसरातील 40 विहिरींच्या पाणी पातळीत देखील वाढ होणार असून या तंत्रज्ञानामुळे 8 ते 10 वर्ष खोलीकरण केलेला नाला टिकून राहणार आहे.
कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी गाडेगावातील पाणी फाऊंडेशन तर्फे सुरु असलेल्या कार्याविषयी आणि त्यातील अडचणींबद्दल रोटरी वेस्ट अध्यक्षा संगीता पाटील यांना माहिती दिली. त्यांनी रोटरी वेस्टच्या रुरल डेव्हलमेंट कमेटीच्या माध्यमातून या अत्यंत संवेदनशील कार्यात सक्रीय सहभाग घेण्याचा निर्णय घेतला.
रुरल डेव्हलपमेंट कमेटी चेअरमन तुषार चित्ते यांनी रोटरी वेस्टचे सदस्य इंजि. राहुल पवार व शैलेंद्र चव्हाण यांच्या सहकार्याने या कार्यास मुर्तरुप देण्याचा प्रयत्न केला. या कामासाठी लागणारे पोकलॅण्ड व श्रमदानासह रोटरी वेस्टच्या सर्व सदस्यांनी तन,मन,धनाने सक्रीय सहभाग देत योगदान दिले.
यांनी दिले योगदान
या कार्यात पाणी फाऊंडेशनचे दुर्गादास जीवरग, कृष्णा गोरे, गाडेगाव सरपंच सुलभा भारंबे, प्रल्हाद भारंबे, रेखा पाटील, रोटरी वेस्टचे मानद सचिव राजेश परदेशी, योगेश राका, कुमार वाणी यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्याच्या लोकार्पण प्रसंगी रोटरी वेस्टचे माजी अध्यक्ष अरुण नंदर्षी, रमण जाजू, योगेश भोळे व अध्यक्षा संगीता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
3 कोटी 30 लाख लिटर पाणी साठविणार
शिवनाला खोलीकरणामुळे एका पावसात 3 कोटी 30 लाख लिटर पाणी साठविले जाणार असून पावसाळ्यात साधारणतः दहा पावसात 33 कोटी लिटरहून अधिक पाणी साठविले जाईल अशी माहिती रोटरी वेस्ट अध्यक्षा संगीता पाटील यांनी देऊन पाणी फाऊंडेशनचे कार्यकर्ते, गाडेगावचे सर्व ग्रामस्थ आणि रोटरी वेस्टचे सर्व सदस्य यांच्या एकत्रीत परिश्रमाला याचे श्रेय आहे असे त्यांनी सांगितले.